
महाराष्ट्रामध्ये भाषिकवाद पुन्हा जोर पकडत आहे. जुन्या डोंबिवली (Dombivali) मध्ये दोन तरूणींनी रस्ता ओलांडण्यासाठी वाटेत असलेल्या काही तरूणांना बाजूला होण्यासाठी 'एक्सक्यूज मी' म्हटलं आणि त्यामधून वाद आणि हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 3 तरूणांनी मुलींवर हात उचलल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडीयात वायरल झाला आहे.
मारहाण झालेल्या मुलींनी विष्णूनगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पुढील तपास केला जाईल असं म्हटलं आहे. अनिल पवार, बाबासाहेब ढबाले, रितेश ढबाले विरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
डोंबिवली मध्ये नेमकं काय झालं?
तरुणी दुचाकीने इमारतीत जात असताना रस्त्यात उभे असलेल्या तिघांना excuse me असं म्हणत बाजूला व्हायला सांगितले...मात्र यानंतर तरुणांनी इंग्रजीत बोलायचं नाही मराठीतच बोलायचं असं म्हणत वाद घातला आणि वाद विकोपाला जाऊन तरुणांनी थेट या दोन तरुणींना मारहाण केली. रितेश बाबासाहेब ढबाले, त्यांची पत्नी आणि बाबासाहेब गोविंद ढबाले आणि त्यांच्या काही साथीदारांनी 'इंग्रजी नको, मराठीत बोला' म्हणत दोघींना चापटा मारून बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर या गोंधळात एका पीडीतेचा नवरा आणि दुसरी मैत्रीण तेथे मदतीला आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. नक्की वाचा: अमराठी लोकांना लक्ष्य केल्याबद्दल Raj Thackeray यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; MNS आक्रमक, दिला सज्जड इशारा- 'त्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचे का, यावरच विचार करावा लागेल' .
महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद उफाळल्याचं पाहायला मिळत होतं. त्यातच आता इंग्रजी बोलण्यावरून वाद निर्माण झाल्यानं त्याची चर्चा सुरू झाली आहे.