Thane Accident: भिवंडीत दोन दिवसांत झालेल्या वेगळ्या रस्ते अपघातात (Accident) दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भिवंडीत (Bhiwandi) 12 जून रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 38 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी माणकोली पुलाजवळील माणकोली गावात घडली. शिवधन मिश्रा (वय, 38) असे मृताचे नाव असून तो भिवंडीत राहणारा असून मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना बेदरकारपणे धडक दिली आणि तेथून पळ काढले. मिश्रा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर मिश्रा यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा -Mumbai Hit And Run Case: कारच्या धडकेत भटक्या कुत्र्याचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल)
या प्रकरणी मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांसह भारतीय दंड संहितेच्या कलम 304(ए) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि कलम 279 (निष्काळजीपणे वाहन चालवणे) अंतर्गत नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारपोली पोलिसांनी सांगितले की, ते जवळपासच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत.
याशिवाय, दुसरी घटना भिवंडीतील कल्याण रोडवर घडली. येथील साई बाबा मंदिराजवळ एसटी बसने दिलेल्या धडकेत 30 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार जखमी झाला आहे. नूरुद्दीन शेख (वय, 30) असे मृताचे नाव असून, जुबेर खान असे जखमी व्यक्तीचे नाव असून तो भिवंडीतील शास्त्रीनगर परिसरात राहत होता. अपघातानंतर दोघांनाही भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे पोहोचताच शेख यांना मृत घोषित करण्यात आले.
तथापी, शांतीनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण घोलप यांनी सांगितले की, बस चालकाच्या म्हणण्यानुसार, दुचाकीस्वार बसला ओव्हरटेक करत होता. पावसामुळे आणि काँक्रीटच्या रस्त्यांमधील दरीमुळे ते घसरले. शेख उजव्या बाजूला पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली, तर खान दुसऱ्या बाजूला पडले. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली.