Traffic Jam in Mumbai: सत्ताधारी पक्षाकडून होत असलेल्या टीकेला अमृता फडणवीस यांचे उत्तर- 'वाहतूक कोंडीमुळे मुंबईचे दरवर्षी 41,000 कोटींचे आर्थिक नुकसान'
Amruta Fadnavis | (Photo Credits: Facebook)

मुंबईमधील (Mumbai) घटस्फोटासाठी (Divorce) ट्रॅफिक जाम (Traffic Jam) आणि रस्त्यांवरील खड्डे कारणीभूत आहेत. यामुळे मुंबईमध्ये 3 टक्के लोकांचे घटस्फोट होतात, असे विधान अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून टीका व्हायला सुरुवात झाली. यावर, ‘कॉमेडीसाठी आपण टीव्हीवर ठेऊ’ अशी प्रतिक्रिया मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. आता याला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी सांगितले की, 'वाहतूक कोंडीमुळे मुंबईचे दरवर्षी 41,000 कोटींचे आर्थिक नुकसान होते.’

आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर, अमृता फडणवीस यांनी ट्वीट केले की, ‘छोटे राजा साहेब, या पेक्षा मोठी कॉमेडी काय होऊ शकते की, नंबर 1 मुख्यमंत्र्यांच्या शहराला Int Co.TomTom च्या ट्राफिक इंडेक्स रिपोर्ट (Traffic Index Report) मधे ‘City with World's Worst Traffic' चा पहिला क्रमांक दिला गेला आहे. जगात सर्वाधिक म्हणजेच 65% कंजेशन लेव्हल (Congestion Level) असल्यामुळे मुंबई दरवर्षी 41,000 कोटीचे आर्थिक नुकसान सोसत आहे.’

अमृता फडणवीस यांच्या विधानावर प्रियंका चतुर्वेदी यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी ट्वीट केले होते की, ‘सर्वोत्कृष्ट (इल) लॉजिक ऑफ द डे अवॉर्ड’ या महिलेला जातो ज्या दावा करतात की 3 टक्के मुंबईकर रस्त्यांवरील रहदारीमुळे घटस्फोट घेत आहेत. मनाला ब्रेकदेण्याऐवजी सुट्टीचा ब्रेक घ्या. बेंगळुरू कुटुंबांनी कृपया हे वाचणे टाळा, तुमच्या विवाहासाठी घातक ठरू शकते.’

या ट्वीटला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणतात, ‘अहो बाई, सत्यापासून दूर जाऊ नका. ‘Survey Monkey’ च्या अहवालानुसार, प्रचंड ट्रॅफिक जाम आणि वाहतुकीला होणारा विलंब यामुळे मुंबईकर मानसिक आणि शारीरिक आजाराने त्रस्त आहेत. कर्मचाऱ्यांची उत्पादकता कमी झाली आहे आणि घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे. तुम्हा सर्वांचे आभार.’ (हेही वाचा: Mumbai: बायका मला बोलतात माझे मानसिक संतुलन ढासळलेय, अमृता फडणवीस नेमक्या अशा का बोलल्या जाणून घ्या)

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्राफिकमुळे 3 टक्के घटस्फोटाच्या दाव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते, ‘मुंबईचे रस्ते गुळगुळीत असल्याचा दावा आम्ही कधीच केला नाही, मात्र माहिती मिळताच आम्ही रस्ते दुरुस्त करतो. ट्रॅफिक जाममुळे घटस्फोटाचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. मुंबईबाबत अशी विधाने करून भाजपला केवळ मुंबईची बदनामी करायची आहे.’