महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस; शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या खास भेटी
BJP-Shiv Sena Political Battle For Power | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीचा 24 ऑक्टोबर रोजी निकाल लागला असून अजूनही राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. या नुवडणुकीत महायुतीने अधिक जागा मिळवल्या असल्या तरीदेखील भाजप- शिवसेना (BJP-ShivSena) यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरु आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 14 दिवस उलटले असून आज महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्रात 9 नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन झाले नाही तर, राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठीच शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil), जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), आशिष शेलार (Ashish Shelar) हे आज 7 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Ashish Shelar) यांची भेट घेणार, अशी माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनाही त्यांच्या नेत्यांसह सत्तास्थापनेच्या बाबतीत चर्चा करणार असल्याचे समजत आहे.

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव निर्माण करुन दोन्ही पक्ष सत्तेत मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घेऊन राज्यात सत्ता स्थापन करु अशी धमकीही भाजप- शिवसेना पक्ष एकमेकांना देत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस झाले असून मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन यावर सविस्तर चर्चा करणार आहेत. कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि अशिष शेलार दुपारी 2.30 वाजता राजभवन येथेच पत्रकारांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर शिवसेनाही आज सत्तास्थापनेच्याबाबत त्यांच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजत आहे. तसेच राज्यात आज मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हे देखील वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेली FB पोस्ट पडली महागात; मिळणार 'ही' शिक्षा

दरम्यान, शिवसेना पक्षाकडून संजय राऊत यांनी आक्रमक भुमिका घेतली असून मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असा त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात कोणाची सत्ता स्थापन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.