Tiger | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात केळापूर तालुक्यात पाटणबोरी परिसरातील एका 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या ‘टी-टी2सी1 या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहेत. या वाघिणीने गेल्या दोन महिन्यांपासून अंधारवाडी, कोबई ,कोपामांडवी, सुनकडी, वासरी, वाऱ्हा या गावांमध्ये धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, तिने अनेकांच्या जनवरांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना ठार केले आहे. या वाघिणीच्या दहशतीमुळे जवळपासच्या अनेक गावात भितीजनक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वनविभागाच्या रॅपीड रेक्सू टीमने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास या वाघिणीस बेशुद्ध करून ताब्यात घेतले आहे. यानंतर तिची रवानगी नागपूरच्या गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी सुभाष कायतवार या नावाच्या युवक या वाघणीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी या वाघणीने अंधारवाडी गावातील रहिवाशी लक्ष्मीबाई भीमराव दडांजे (वय, 60)  यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे या वाघिणीला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीनुसार समितीची एक बैठकही पार पडली होती. हे देखील वाचा- Eastern Express Highway Jammed Due To Python: 8 फुटी अजगरामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; पहा फोटोज

पीटीआयचे ट्विट-

वाघणीच्या दहशतीमुळे यवतमाळ जिल्ह्यात असंतोष निर्माण झाला होता. यातच अमरावती येथील विशेष पथक चार दिवसांपासून बोरी, अंधारवाडीच्या जंगलात या वाघिणीवर नजर ठेवून होती. या वाघिणीस पकडण्याचा आदेश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी मंगळवारी दिले. त्यानंतर वाघिणीस पकडण्याच्या हालचाली तीव्र झाल्या. आज बुधवारी सकाळी ही वाघीण अंधारवाडी परिसरात जंगलात फिरताना आढळली. त्यानंतर या वाघिणीला जेरबंद करण्यात आले. वाघिणीला जेरबंद करण्यात आलेली बातमी ऐकताच नागरिकांनी जल्लोष केला.

याआधीही अवनी नावाच्या या नरभक्षक वाघिणीने 13 जणांवर हल्ला करत त्यांना ठार केल्याची माहिती समोर आली होती. या वाघिणीच्या दहशतीमुळे संघर्ष शिगेला पोहचला होता. त्यानंतर या वाघणीस हैदराबादच्या शूटरच्या माध्यामातून गोळ्या घालून ठार करण्यात आले होते.