मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा कोणताही अपघात झाला नाही: भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये
Devendra Fadanvis, Helicopter प्रतिकात्मक फोटो (File Photo)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा पुन्हा एकदा अपघात झाला असल्याचे वृत्त सर्वत्र फिरत आहे.

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री आज पेण (ऑक्टोबर 11) येथे प्रचार सभेसाठी जात होते. हेलिकॉप्टर लँड होत असताना अचानक त्याची चाकं चिखलात रुतली, ज्यामुळे पायलटचा हेलिकॉप्टरवरील कंट्रोल सुटला. परंतु त्याने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टरवर नियंत्रण पुन्हा मिळवले आणि हेलिकॉप्टर व्यवस्थित लँड करण्यात तो यशस्वी झाला. हा प्रसंग घडला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे स्वीय सचिव तसेच एक इंजिनिअर, एक पायलट आणि एक को-पायलट असे एकूण पाचजण उपस्थित होते.

अबब! भाजपकडे पैसाच पैसा.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खर्च केली विरोधकांपेक्षा चौपट रक्कम: ADR अहवाल

परंतु भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारांशी बोलताना ही घटना खोटी असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, "पेण येथे लँडिंग करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले, अशा आशयाच्या बातम्या दाखविल्या जात आहेत. वस्तुत: कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. लँडिंग करताना पायलट काळजी घेऊनच लँड करीत असतात. मुख्यमंत्री आपल्या सर्व नियोजित सभा पूर्ण करीत आहेत. त्याच हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री उल्हासनगर येथे रवाना झाले आणि तेथील सभाही त्यांनी केली. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवेवर, चुकीच्या माहितीवर कुणीही विश्वास ठेऊ नये."