राज्यसरकारने सर्व आमदारांचा 2 वर्षांचा निधी आणि 30 टक्के वेतन कपात करून तो निधी कोरोनाच्या निर्मूलनासाठी वर्ग करावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. केंद्राने खासदारांचा 2 वर्षांचा निधी तसेच राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्र्यांच्या व खासदारांच्या वेतनात 30 टक्के कपात केली. हा निधी त्यांनी कोरोनासाठी वर्ग केला. त्यामुळे राज्य सरकारनेही अशा स्वरुपाचे धोरण अवलंबवावे, असे मत रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषीत केले आहे. तसेच कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी मोदींनी पीएम केअर फंडची निर्मिती केली आहे. मोदींनी पीएम केअर फंडच्या माध्यमातून देशातील जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. रामदास आठवले यांनी कोरोनाच्या लढाईसाठी पंतप्रधान निधीत खासदार निधीतून 1 कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 महिन्यांचं वेतनही दिलं आहे. (हेही वाचा - मुंबई: सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून न फिरणा-यांवर कलम 188 अंतर्गत होणार कारवाई- BMC)
दरम्यान, आज रामदास आठवले यांनी राज्यातील सर्व आमदारांचा 2 वर्षांचा निधी आणि 30 टक्के वेतन कपात करून तो निधी कोरोनाच्या निर्मूलनासाठी वर्ग करावा, अशी मागणी केली आहे. देशातील संकटकाळात रामदास आठवले यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी 'संविधान' या बंगल्यावर गरजूंसाठी 14 एप्रिलपर्यंत मोफत जेवण्याची सुविधा केली आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात 1 हजार पेक्षा जास्त रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्याकडे पुरेशा निधीची आवश्यता आहे. म्हणून राज्यातील आमदारांची 30 टक्के वेतन कपात करून हा निधी कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी द्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.