CNG Rate: राज्य सरकारने 1 एप्रिलपासून CNG वरील मूल्यवर्धित कर 13.5 टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आणण्याचा घेतला निर्णय
(Photo Credit - PTI)

राज्य सरकारने (State Government) शनिवारी 1 एप्रिलपासून मूल्यवर्धित कर (VAT) 13.5 टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) स्वस्त होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा निर्णय घेतला. सीएनजीच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात केल्याने इंधन म्हणून सीएनजी वापरणाऱ्या टॅक्सी आणि ऑटो-रिक्षातून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना फायदा होईल. सीएनजीच्या किमती कमी करण्यावर सरकारचा भर देखील पर्यावरणास अनुकूल असलेल्या वाहतुकीच्या अधिकाधिक वापरास प्रोत्साहन देण्याच्या दिशेने आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी हे पर्यावरणास अनुकूल मानले जाते.

दोन आठवडे चाललेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पवारांनी सरकार सीएनजीच्या किमती कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्री महोदयांनी वित्त विभागाला प्रक्रिया सुरू करून त्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले. हेही वाचा Petrol-Diesel Price Today: इंधनाचा भडका! 5 दिवसांत पेट्रोल-डिझेल 3.20 रुपयांनी महागले

पवार म्हणाले, राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. सीएनजीवरील व्हॅट कपात हे त्या दिशेने एक पाऊल आहे. ऑटो-रिक्षा आणि टॅक्सींवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांना दररोज प्रवास करण्यास मदत होईल.