Petrol-Diesel Price Today: देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज 26 मार्च रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या आठवड्यातील 5 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Fuel Price) वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ केली आहे. अशाप्रकारे पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांनी वाढ झाली आहे.
भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, आज राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलची किंमत 98.61 रुपये प्रति लिटर तर डिझेलची किंमत 89.87 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे. (हेही वाचा - अबब! बटाटे काढण्यासाठी गेलेल्या महिलेला शेतात सापडली सोन्याची नाणी; 27 हजार रुपयांना विकलं एक नाणं; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या)
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 26 मार्च 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.51 रुपये वरून 113.35 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलचा दर आता 96.70 रुपयांवरून 97.55 रुपये प्रति लिटर झाला आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व महानगरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे विकले जात आहे. पेट्रोलच्या वाढत्या दराने देशभरात उच्चांक गाठला आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये पेट्रोलचा दर 113.03 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तर डिझेल 96.30 प्रति लिटर विकले जात आहे.
एका आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 5 दिवसात 4 वेळा वाढल्या आहेत. 22 मार्च रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर 23 मार्च रोजी दोन्ही इंधनांच्या किमती 80-80 पैशांनी वाढल्या होत्या. त्याचवेळी, 25 आणि 26 मार्च रोजी तेल कंपन्यांनी राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ केली आहे.
दरम्यान, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या बाजारात चढ-उतार होत आहेत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचला. त्यानंतर आता पुन्हा ब्रेंट क्रूडच्या किंमतीत थोडीशी उसळी पाहायला मिळत आहे.