Uddhav Thackeray On MLAs Disqualification: 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सभापतींनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा; उद्धव ठाकरे यांची मागणी
Uddhav Thackeray (PC - ANI)

Uddhav Thackeray On MLAs Disqualification: शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील त्रिपक्षीय महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार कोसळून गेल्या वर्षीच्या राजकीय संकटावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेण्यास सांगितला आहे. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना यासंदर्भात लवकरात-लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितले की, ते सभापती नावेरकर यांना पत्र लिहून या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आवाहन करणार आहेत. दरम्यान, गुरुवारी न्यायालयाने उद्धव ठाकरे यांचे सरकार पुन्हा स्थापन करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं. न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. आपण नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आता एकनाथ शिंदे यांनीदेखील नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेबांनी मराठी माणूस, हिंदुत्वासाठी जी शिवसेना निर्माण केली, ती शिवसेना आज गद्दारांच्या माध्यमातून भाजपसोबत गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या लोकांचा चेहरा देशासमोर आणला आहे, असंही ठाकरे यावेळी म्हणाले. (हेही वाचा - Ajit Pawar on Uddhav Thackeray: नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची आवश्यकता नाही- अजित पवार)

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानू इच्छितो की, त्यांनी देशद्रोह्यांचा चेहरा देशासमोर आणला. काल भाजपने उत्सव साजरा केला. पण गद्दारांनी उत्सव का साजरा केला हे समजत नाही. विधानसभा अध्यक्षांवर भाष्य करताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय सभापतींना दिला आहे. आधी स्पीकर आमच्यासोबत होते, नंतर राष्ट्रवादीत गेले आणि आता ते भाजपमध्ये आहेत.

तथापी, आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर बोलताना ठाकरे म्हणाले, आज मी माझ्या निर्णयावर समाधान व्यक्त करतो. ज्यांनी विश्वासघात केला त्यांनी सरकार स्थापन केले. अशा परिस्थितीत मला मुख्यमंत्रीपदी राहायचे नव्हते आणि नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा दिला. त्याआधारे एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा द्यावा.