Shiv Sena MP Sanjay Raut |(Photo Credits: ANI)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकलेल्या मजूरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी मदत करत आहे. सोनू सूद यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होतं आहे. परंतु, असं असताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोनू सूदच्या सामाजिक कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी सामनातील ‘रोखठोक’ या सदरात सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होट बँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा आरोप केला आहे.

आज सोनू सूद यांनी उशीरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ‘अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला. मातोश्रीवर पोहोचले जय महाराष्ट्र,’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. (हेही वाचा - अभिनेता सोनू सूद च्या चांगल्या कामांमागे कोणीतरी राजकीय दिग्दर्शक असण्याची शक्यता- संजय राऊत)

आज सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी सोनू सूद चा उल्लेख 'महात्मा सोनू' असा केला आहे. तसचं सोनू सूद च्या चांगल्या कामांमागे कोणीतरी राजकीय दिग्दर्शक असण्याची शक्यतादेखील संजय राऊत यांनी वर्तविली आहे. सोनू सूदच्या मुद्दयावरून आज दिवसभर राजकारण तापलं असताना सोनूने रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी सोनू सूद यांच्याबरोबर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखदेखील मातोश्रीवर दाखल झाले. या सर्व प्रकारानंतर संजय राऊत यांनी सोनू सूदवर टीका केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सोनू सूद यांनी प्रतिक्रीय देताना म्हटलं आहे की, 'आम्हाला त्रास होत असलेल्या आणि गरज असलेल्या सर्व लोकांना आधार द्यावा लागेल. शेवटचा स्थलांतरित मजूर त्याच्या घरी पोहोचल्याशिवाय मी मदतकार्य थांबवणार नाही. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या प्रत्येक पक्षाने मला पाठिंबा दर्शविला आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.'

सोनू सूद आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान शिवसेना युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सोनू सूद यांच्या भेटीदरम्यानचा फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सुरू असलेल्या मदतकार्याबद्दल चर्चा केली. सोनु सूद यांच्या कामाबद्दल कोणताही गैरसमज नाही. परंतु, लोकांना मदत करण्याची वचनबद्धता कायम आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी टविटमध्ये म्हटलं आहे.