ठाणे: रस्त्यांवर धावल्या व्हिन्टेज कार्स; प्रदर्शनासह रॅलीला ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद
Vintage Car Rally in Thane (Photo Credit: Twitter)

रस्ता सुरक्षा अभियान (Road Safety Week) या अंतर्गत ठाण्यात रविवारी (23 फेब्रुवारी) दुर्मीळ गाड्यांची रॅली काढण्यात आली होती. कोपरी येथील आनंदनगर जकातनाका ते रेमंड मिल कमाऊंड अशी 21 किलोमीटरची रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीतील व्हिंटेज गाड्या पाहण्यासाठी ठाणेकरांनी रस्त्यावर गर्दी केली होती. या रॅलीत 1962 ते 2012 पर्यंतच्या एकूण 32 व्हिंटेज कार्स पाहायला मिळाल्या. यात बिटल, सुपर बिटल, बग्गी, नवी बिटल, कारमन्न घिया आणि लाल-पांढऱ्या बसचा समावेश होता. जुन्या, दुर्मिळ, रंगीत गाड्या नागरिकांचे लक्ष वेधत होत्या.

रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने ठाणे वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, रेमंड लिमिटेड आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील रेमंड मिल कंपाऊंडमध्ये दुर्मीळ कार आणि दुचाकीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या रॅलीचा एक भाग म्हणून या व्हिंटेज ब्युटी ठाण्याच्या रस्त्यांवर फिरताना दिसल्या. या प्रदर्शनात 39 कार तसेच 30 दुचाकींचा सामावेश होता. 1886 ते 1988 या काळातील विटेंज कार्स यावेळी ठाणेकरांना पाहता आल्या.

रॅलीमध्ये ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन तसेच व्हिंटेज आणि क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन डोसा हे देखील सहभागी झाले होते. या रॅलीला ठाणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. वाहन सुरक्षितरित्या चालवण्याचे संदेश या रॅलीतून ठाणेकरांना दिले जात होते.

प्रदर्शन, रॅलीला दिलेला प्रतिसाद पाहता ठाणेकरांसाठी आयोजित करण्यात आलेली व्हिंटेज कारची ही अनोखी सफर त्यांना चांगली भावल्याचे दिसते.