Thane Unlock: 15 ऑगस्ट पासून ठाणे येथील सर्व दुकानं दररोज उघडण्यास परवानगी
Shops | Representational Image | (Photo Credits: ANI)

15 ऑगस्ट पासून ठाणे (Thane) महानगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने रोज खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी ठाण्यातील दुकाने ऑड, इव्हन सिस्टमवर (Odd-Even System) खुली करण्यात येत होती. मात्र आता सर्व दुकाने रोज उघड्याची परवानगी मिळाली आहे. परंतु, यातून हॉटस्पॉट (Hotspot) वगळण्यात आले आहेत. तसंच मॉल्स आणि बाजारातील दुकानांनाही अद्याप परवानगी मिळालेली नाही. गुरुवारी शहरातील ट्रेडर्ससह पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्यानंतर अनलॉकचा आदेश जाहीर करण्यात आला. या नव्या निर्णयामुळे ठाण्यातील दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.

नव्या नियमानुसार, ठाण्यातील सर्व दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात दररोज खुली असतील. ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले की, ऑड, इव्हन सिस्टमनुसार दुकाने खुली ठेवल्याने ट्रेडर्संना नुकसान होत होते. ठाण्यातील कोरोना बाधितांच्या संख्याही कमी होत असल्याने अनलॉकचा आदेश जारी करण्यात आला. 15 ऑगस्टपासून नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल. सोशल डिस्टसिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जाणे गरजेचे आहे. केवळ स्टँडअलोन दुकानांनाच यात परवानगी देण्यात आली आहे. तसंच हॉस्टस्पॉट मधील दुकानं, मॉल्स आणि बाजारातील दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही. (कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी ऑनलाईन गणपती विसर्जन करण्याची सोय; ठाणे महानगरपालिकाचे महत्त्वपूर्ण निर्णय)

काल नागरी संस्था अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रेडर्सच्या मागण्यांचा विचार करण्याची विनंती केली होती. दुकाने सर्व दिवस खुली ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र कोरोना बाधितांची संख्या विचारात घेता ठाण्यात या नियम लागू करण्यात आला नव्हता. परंतु, आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे दुकाने रोज सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, पालकमंत्री असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.