CIDCO Launches Sale Plots And Shops: शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (CIDCO) नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये निवासी घरे, बंगले, निवासी-सह-व्यावसायिक, व्यावसायिक, सेवा उद्योग आणि तारांकित हॉटेल वापरासाठी 48 भूखंड आणि सिडकोच्या विविध गृहसंकुलांमध्ये 218 दुकाने विक्रीची भव्य योजना सुरू केली आहे. भूखंड विक्री योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी 6 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे, तर दुकानांच्या विक्री योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी 16 जुलै 2024 पासून सुरू होईल.
याबाबत सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले, ’सर्वसामान्य नागरिकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच सिडको शहरातील स्थावर क्षेत्र आणि व्यावसायिक उपक्रमांना चालना देण्यासाठी भूखंड, दुकाने आणि व्यावसायिक जागेच्या विक्रीसाठी सातत्याने विविध योजना राबवते. या योजना नवी मुंबईच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत, तसेच त्या सर्वसामान्य नागरिकांना सॅटेलाइट सिटीमध्ये त्यांच्या स्वप्नातील घर (बंगला) बांधण्याची सुवर्णसंधी देतात. या योजनांद्वारे विकासक, व्यापारी, लघु आणि मध्यम उद्योजकांनाही त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळाली आहे.
सिडको सातत्याने निवासी आणि व्यावसायिक भूखंड, दुकाने आणि व्यावसायिक जागेच्या विक्रीसाठी योजना राबवत आहे. आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या योजनांना नागरिक, व्यापारी आणि विकासकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी सिडकोने घणसोली, नेरुळ, सीबीडी बेलापूर, खारघर, कोपरखैरणे, कळंबोली, पनवेल (पू) आणि पनवेल (प) या नोड्समध्ये ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेद्वारे 48 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. या जागांसाठी 23 जुलै 2024 पर्यंत https://eauction.cidcoindia.com वर ऑनलाइन नोंदणी करता येईल. योजनेचा निकाल 25 जुलै 2024 रोजी जाहीर केला जाईल. हे भूखंड पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहेत आणि महामार्ग, मेट्रो आणि रेल्वेद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आहेत. हे भूखंड प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीएच्या अगदी जवळ आहेत. (हेही वाचा: Teerth Darshan Yojana: देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची ज्येष्ठ नागरिकांना मोफत यात्रा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा)
त्याचप्रमाणे सिडकोच्या तळोजा, कळंबोली, घणसोली, खारघर, द्रोणागिरी नोड्स येथील विविध गृहनिर्माण संकुलांसह स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील 218 दुकाने ई-निविदा कम ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी 16 जुलै 2024 रोजी सुरू होईल आणि 20 ऑगस्ट 2024 रोजी निकाल जाहीर केला जाईल. या दुकानांच्या माध्यमातून लघु आणि मध्यम उद्योजकांना नवी मुंबईत त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळणार आहे.