Thane: शेजारी राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी दोन भावांना अटक; भिवंडी येथील घटना
Representational Image (Photo Credits: Pixabay)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडीमधून (Bhiwandi) महिलेच्या हत्येची धक्कादायक घटना समोर येत आहे. दोन भावांनी शेजारी राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या केली. जुनैद फारुकी (30) आणि यतिन फारुकी (25) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना भिवंडीतील हनुमान टेकाडी (Hanuman Tekadi) भागातून आज ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक आरोपी शेजारील महिलेवर सतत नजर ठेवून होता. हे त्या महिलेला आवडत नसे. तसंच यावरुन आरोपींच्या कुटंबातही वाद सुरु होते. गुरुवारी रात्री या दोन्ही भावांनी मोठ्या कपड्याने महिलेचा गळा दाबून तिची हत्या केली.  (मुंबई: धक्कादायक! 25 वर्षीय Drug Addict नातवाने उडवले आजीचे मुंडके)

या प्रकरणी आरोपींवर आयपीसी सेक्शन 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे झोन II चे डिसीपी राजकुमार शिंदे यांनी सांगितले. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Husband Kills Wife: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीने मृतदेह पुरला शेतात; बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील घटना)

महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. बलात्कार, लैंगिक शोषण, कौटुंबिक छळ, हत्या, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे अशा गुन्हांमध्ये वाढ होत आहे. आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी महिलेच्या हत्येची दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षाचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे.

दरम्यान, काल पुण्यातील एका महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तिने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तर नागपूर मधील एका महिलेने सासरच्या छळाला कंटाळून दोन मुलींसह तलावत उडी घेतली. यात धाकट्या मुलीचा जीव वाचला असून आई आणि मोठ्या मुलीला प्राण गमवावे लागले.