Thane Rains and Weather update: ठाणे जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह दमदार पाऊस, सामान्यांची तारांबळ
Rains | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

ठाणे जिल्ह्यात (Thane Rains) आज पहाटे अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावली. पहाटे सहाच्या सुमारास मेघगर्जना (Thunder) आणि विजांचा (Lightning ) कडकडाट यांसह पावसाच्या सरी जोरदार बरसल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे पहाटेच्या वेळी फिरायला (Morning Walk) गेलेल्या आणि दिवसपाळीच्या कामासाठी घरातून सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. हे दिवस कडक उन्हाळ्याचे आहेत. त्यामुळे पाऊस पडेल असे कोणीच गृहीत धरलेले नसते. अशा वेळी नागरिक पावसाळ्यात वापरण्याचे कपडे, छत्री, पिशव्या आदी गोष्टी हाताशी ठेवत नाहीत. परिणामी अचानक आलेला पाऊस चांगलीच धांदल उडवतो.

हवामान विभागाने या आधीच हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. ठाणे जिल्ह्यात पाठीमागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उष्णताही वाढली होती. त्यामुळे उकाड्याला कातावलेले नागरिक वातावरणात काहीसा गारवा यावा यासाठी निसर्गाकडे प्रार्थना करत होते. कदाचित ही प्रार्थना निसर्गाने ऐकली असावी. आज सकाळीच दमदार पावसाने ठाणे शहर आणि परिसरात हजेरी लावली. (हेही वाचा, Unseasonal Rain In Buldhana: बुलढाणा जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस, Watch Video)

ठाणे शहरातील वागळे इस्टेट, चरई, राम मारुती रोड, स्टेशन परिसर यांसह कळवा, मनिशानगर, खारेगाव, पारसिक नगर आदी भागांमध्ये दमदार पाऊस पाहायला मिळाला. या पावसामुळे पाठिमागून काही दिवस उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांची सुटका होणार आहे.

दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणीही अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सध्या ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांच्या काढणीचा हंगाम आहे. अशा वेळी काही शेतकऱ्यांची पिके काढणीला आली आहेत. काहींची पिके काढून मळणीच्या प्रतिक्षेत शेतातच आहेत. तर काहींची पिके मागास झाल्याने काढणीला काहीसा वेळ आहे. त्यातच अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने पिकांना फटका बसतो आहे. खास करुन द्राक्षे, कांदा, कापूस अशा व्यापारी पिकांनाही मोठाच फटका बसू लागला आहे. ज्यामुळे राज्यातील शेतकरी बेचैन झाल्याचे पाहायला मिळत आहे.