CM Uddhav Thackeray, Aditya Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ठाणे पोलिसांनी (Thane Police) बुधवार, 13 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरुद्ध मनसेच्या रॅलीदरम्यान मंचावर तलवारबाजी केल्याच्या आरोपाखाली शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही असाच गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे करत असून, मागणी पूर्ण न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसेचे ठाणे आणि पालघरचे अध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले की, ‘जर राज ठाकरे यांच्यावर तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल होत असेल, तर तसाच गुन्हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलावरही दाखल करण्यात यावा. महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी मंचावर आणि जाहीर सभांमध्ये तलवारी दाखवल्या आहेत, मग फक्त राज ठाकरेंवरच गुन्हा दाखल करावा असे का वाटले? यावरून दिसते की, सरकार राज ठाकरे यांना कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘राज ठाकरे यांच्यावर असे अनेक गुन्हे आहेत, पण आम्हाला त्याची पर्वा नाही. पण सरकारकडून जी काही पावले उचलली जात आहेत ती चुकीची आहेत. राज ठाकरे, कुठेही चुकीचे नाही. ते मेळाव्यात जे काही बोलले ते पुराव्यानिशी बोलले.’  ते म्हणाले, ‘राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा. तलवारी दाखविणे ही एक प्रकारची संस्कृती आहे. राज यांच्यावरील खटला परत न घेतल्यास किंवा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर, आम्ही रस्त्यावर येऊ आणि कृपया तसे होऊ देऊ नका.’

दरम्यान, मनसेची मंगळवारी ठाण्यात झालेली उत्तर सभा चांगलीच चर्चेत आहे. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती. या प्रकरणी ठाणे येथील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मनसे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.