ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ: भिवंडी ग्रामीण ते मुरबाड चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून
ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ (Photo Credits: File Image)

Maharashtra Assembly Elections 2019: मुंबईच्या शेजारील सर्वात महत्वाचा जिल्हा म्हणजे ठाणे (Thane), भौगोलिक दृष्टीने ठाणे जिल्ह्याचा प्रसार मोठा असल्याने या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 18 मतदारसंघ आहेत. यामध्ये भिवंडी (Bhiwandi), कल्याण (Kalyan) या मतदारसंघात ग्रामीण स्वरूपात सुद्धा निवडणूक पार पडते. ठाणे जिल्ह्यातील काही निवडक ठिकाणे सोडल्यास अनेक जागा या आधीपासूनच शिवसेना (Shivsena)  आणि भाजपाच्या (BJP) हाती आहेत. यंदाच्या निवडणुकीत आपले पूर्वमतदारसंघ राखून ठेवण्यासाठी युतीतर्फे तर याठिकाणचे निकाल पालटून टाकण्यासाठी आघाडी कडून कसून मेहनत घेतली जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 288 मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तत्पूर्वी ठाणे जिल्ह्यातील प्रथम सहा मतदारसंघांचा एक आढावा सादर करत आहोत. यामध्ये भिवंडी ग्रामीण (Bhiwandi Rural), शहापूर (Shahapur), भिवंडी पूर्व (Bhiwandi East), पश्चिम (Bhiwandi West), कल्याण ग्रामीण (Kalyan Rural) आणि मुरबाड (Murbad) या जागांचा समावेश आहे.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात 2014  साली शांताराम मोरे यांनी 9 हजाराहून अधिक मतांनी भाजपाच्या शांताराम पाटील यांना मागे टाकत विजय मिळवला होता. त्यावेळी मनसे व राष्ट्रवादीचे उमेदवार काही कमाल करू शकले नव्हते, यामुळे यंदासुद्धा युतीने ही जागा सेनेसाठी ठेवून शांताराम मोरे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या माधुरी म्हात्रे, मनसेकडून शुभांगी गोवारी आणि वंचित बहुजन आघाडी कडून स्वप्नील कोळी हे उमेदवार आहेत.

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ

भिवंडी पश्चिमसाठी विद्यमान आमदार महेश चौघुले यांना भाजपाकडून तिकीट कायम ठेवण्यात आले आहे. मागील निवडणुकीत त्यांनी जवळपास 43 हजार मते मिळवून अन्य मुख्य पावसाच्या उमेदवारांना मागे टाकले होते. यंदा चौघुले यांच्याविरुद्ध काँग्रेसचे शोएब अश्फाक आणि मनसेचे नागेश मुकादम हे उमेदवार असणार आहेत.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ

भिवंडी पूर्व मतदारसंघ हा 2014 पासूनच शिवसेनेच्या हातात आहे. याठिकाणी रुपेश म्हात्रे यांना 2014 साली जवळपास 34 हजार मते मिळवत विजय मिळवला होता. याआधी 2009 साली येथे समाजवादी पक्षाची सत्ता होती. यंदा सेनेने विद्यमान आमदार म्हात्रे यांना तिकीट दिले असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे संतोष शेट्टी आणि मनसेचे मनोज गुडवी असे उमेदवार असतील.

शहापूर विधानसभा मतदारसंघ

2014 साली शहापूर येथून राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोडा यांना विजय मिळाला होता, मात्र त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यामुळे यंदा बरोडा हे सेनेचे अधिकृत उमेदवार आहेत तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे दौलत दरोडा हे निवडणूक लढवणार आहेत. योगायोग म्हणजे 2009 साली दरोडा हे देखील शिवसेनेचे आमदार म्हणून निवडणूक आले होते आणि त्यानंतर लगेचच त्यांनी राष्ट्रवादीमध्य प्रवेश घेतला होता.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

कल्याण शहराच्या व्यक्तिरिक्त हा ग्रामीण विधानसभा मतदारसंघ देखील बराच महत्वाचा मानला जातो. याठिकाणी शिवसेनेचे रमेश म्हात्रे आणि मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील अशी दुहेरी लढत होणार आहे. 2014 साली देखील याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांनी त्यावेळेचे मनसेचे विद्यमान आमदार रमेश पाटील यांना मागे टाकले होते तर रमेश पाटील यांनी त्याआधी सध्याचे उमेदवार रमेश मंत्रे यांना हरवून विजय मिळवला होता.

मुरबाड विधानसभा मतदारसंघ

मागील दोन निवडणुकींपासून किसान कथोरे हे मुरबाड येथील आमदारकी मिळवत आहेत. 2009 साली राष्ट्रवादीकडून तर 2014 साली शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. यंदा त्यांना भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी देण्यात आली आहे. तर, कथोरे यांचं विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव आणि मनसेचे नितीन देशमुख हे उमेदवार आहेत.

दरम्यान सध्या कार्यरत असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.