डोंबिवली पोलिसांनी (Dombivali Police) शनिवारी एका अल्पवयीन मुलीच्या वडील आणि भावासह कुटुंबियातील एकूण 11 सदस्यांना अटक केली आहे. मागील महिन्यात दिवा-कोपर रेल्वे स्टेशन दरम्यान रत्नागिरी एक्स्प्रेस (Ratnagiri Express) मधून अल्यवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडला ढकलल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) भदोई येथे राहणाऱ्या साहिल हाश्मी याचा मृतदेह 19 जून रोजी कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाशेजारी आढळून आला होता. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या साहिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र साहिलच्या मोबाईलवरुन त्याच्या नातेवाईकांशी संपर्क केला असता वेगळी माहिती समोर आली आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
साहिल हाश्मी रोजी अल्पवयीन प्रेयसीसोबत पळाला होता. याची माहिती तिच्या वडीलांना मिळताच त्यांनी तिच्या अंबरनाथमधील भावाला याची माहिती दिली. त्यानंतर तिच्या भावाने आपल्या इतर नातेवाईक आणि मित्रांसह कल्याण स्टेशन गाठले. रत्नागिरी एक्स्प्रेसने निघालेले साहिल आणि त्याची प्रेयसी 19 जून रोजी रात्री 10 वाजता कल्याण स्थानकात पोहचले. गाडी कल्याणला पोहचताच सर्व आरोपींनी गाडीत प्रवेश करत या दोघांना शोधून काढले. त्यानंतर साहिलला बेदम मारहाण करून कोपर ते दिवा दरम्यान चालत्या गाडीतून ढकलून दिले होते. (मुंबई: बॉयफ्रेंड कडून बलात्कार झाल्याने तरूणीने मारली 6 व्या मजल्यावरून उडी; 20 वर्षीय मुलाला अटक)
याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचे वडील शब्बीर हाश्मी याच्यासह भाऊ कासीम हाश्मी, गुलाम हाश्मी आणि 10 जणांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.