सहा महिन्यांपूर्वी एमपीएसीच्या परीक्षा (MPSC Exam) पास होऊन देखील मुलाखतीसाठी बोलवणं येत नसल्यानं नैराश्यात जाऊन 24 वर्षीय स्वप्नील लोणकरने (Swapnil Lonkar) आत्महत्या केली होती. कोविड 19 आणि त्यामध्ये सरकारी कामांचा मंद वेग यामुळे लांबलेल्या अनेक नियुक्त्या आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. अशात स्वप्नीलच्या घरी एमपीएससी कडून मुलाखतीसाठी उमेदवारी यादी जाहीर करताना त्यामध्ये स्वप्नीलच्या नावाचाही समावेश झाल्याचं पत्र आल्याने त्याच्या घरातील व्यक्तींनी संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचं सांगत त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत.
दरम्यान स्वप्नील लोणकर याचं नाव महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या मुलाखतीच्या यादीत आलं आहे. स्वप्नीलने आत्महत्या केल्यानंतर महाराष्ट्र हळहळला होता. राजकारण तापलं होतं. पण आता एमपीएससीचा हा भोंगळ प्रकार संतापजनक असल्याचं सांगत अनेकांनी आपला राग व्यक्त केला आहे. मीडीयाशी बोलताना स्वप्नीलच्या वडिलांनीही आपला राग बोलून दाखवला आहे. हे देखील वाचा: Swapnil Lonkar Suicide: स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांना कर्जफेडीसाठी भाजकडून 19.96 लाखांची आर्थिक मदत .
स्वप्नीलने पुण्यात 29 जुलै 2021 दिवशी आत्महत्या केली होती. त्याच्या सुसाईड नोट मध्ये लिहण्यात आलेल्या मजकूरामध्ये त्याने 'पासआऊट होऊन 2 वर्ष झाली. 24 वय संपत आलं आहे. घरची परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, सार्यांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. त्यामधून मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कुणालाही जाबाबदार धरू नये' असे त्याने लिहले होते.