Mumbai Mayor Kishori Pednekar | (Photo Credits: ANI/File)

Sushant Singh Rajput Case: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी बिहारचे पोलीस अधिकारी (Bihar Police Officer) विनय तिवारी (Vinay Tiwari) यांच्या क्वारंटाईन प्रकरणावरुन निर्माण झालेल्या वादळावर प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आणि आयसीएमआरचे नियम सर्वांना लागू आहेत. त्यामुळे कोणालाही कोणत्याही कृतीसाठी भाग पाडले जात नाही. लोकांना एक तर हॉटेलमध्ये अथवा घरी क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे एसओपीच्या नियमानुसारच सर्व काही करण्यात आले आहे. कोणावरही सक्ती करण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली आहे.

सुशांत सिंह राजपूत यांच्या वडिलांनी पाटना पोलिसांमध्ये एक तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर बिहार पोलीसांमधील काही अधिकारी मुंबईमध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, याच प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी (Binay Tiwari) हे पाटणा येथून मुंबईत आले आहेत. (हेही वाचा, आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्वारंटाइन करण्यात आले; मुंबई महानगरपालिकेचे स्पष्टीकरण)

दरम्यान, मुंबई महापालिकेने आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे तिवारी हे सध्या गोरेगाव येथील एका गेस्टहाऊसमध्ये राहात आहेत. तिवारी यांच्या हातावर होम क्वारंटाईन असा शिक्काही मारण्यात आला आहे. तिवारी यांना पुढील आदेश येईपर्यंत क्वारंटाईन सेंटरमध्येच राहावे, असे सांगण्यात आले आहे. तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.