Supriya Sule यांचं एक विधान आणि पुन्हा BMC निवडणूकीसाठी शिवसेना-एनसीपी युतीच्या चर्चांना उधाण
Supriya Sule | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये पालिका निवडणूकींची रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणूकांसाठी नुकतीच प्रभाग रचना जाहीर झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एनसीपी खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बीएमसी (BMC)  वर पुन्हा शिवसेनेचाच (Shiv Sena) भगवा फडकणार आणि सेनेचाच महापौर होणार असं भाकित वर्तवल्यानं चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. सुप्रिया सुळे यांचं हे वक्तव्य म्हणजे शिवसेना-एनसीपी युतीचे संकेत असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

बीएमसीच्या जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरून कॉंग्रेसने ते शिवसेनेच्या फायद्याचे करून घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी मध्ये कॉंग्रेस, शिवसेना, एनसीपी एकत्र असली तरीही हे तिन्ही पक्ष पालिका निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे. मुंबई कॉंग्रेस पालिका निवडणूकीमध्ये एकला चलो रे च्या भूमिकेवर असल्याचं त्यांच्या नेत्यांनी यापूर्वी अनेकदा बोलून दाखवलं आहे. त्यामुळे आता बीएमसी निवडणूकीसाठी शिवसेना-एनसीपी एकत्र जाण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप यावर कोणत्याही पक्षाकडून जाहीर घोषणा झालेली नाही. हे देखील नक्की वाचा: BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युती? ठाकरे, पवार यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त .

मुंबई महानगर पालिकेवर मागील 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सेनेकडून जोर लावला आहे.मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सेनेने पालिका निवडणूकीची जबाबदारी टाकली आहे.

शिवसेनेचे सध्या 97 नगरसेवक आहेत आणि राष्ट्रवादीकडे 8 नगरसेवक आहेत. दोन्ही मिळून एकूण 105 ठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे. सत्ता मिळवण्यासाठी 114 जागांची गरज आहे. आगामी निवडणूकीमध्ये थोडा अधिक प्रयत्न करून नगरसेवक वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. अमराठी भागात एनसीपीला जागा देऊन नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो.