Uddhav Thackeray, Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election 2022) जसजशी जवळ येईल तसतशी राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग येतो आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकीतच आपली सर्वसमावेशक भूमिका बदलत हिंदुत्त्ववादी भूमिका धारण केली. परप्रांतियांबद्दलचीही त्यांची भूमिका काहीशी मवाळ झाली आहे. ते पाहून भाजपच्या अनेक नेत्यांनी 'शिवतीर्थ' येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर महाविकासाघाडीच्या गोटातही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या दृष्टीने दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु असून आगामी निवडणुकीत शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस ((Shivsena Ncp Alliance) ) एकत्र लढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री तथा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात याबात चर्चा झाल्याचेही वृत्त आहे.

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली. राज्यात भाजपला रोखण्याच्या मुद्द्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी ठाम आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक पातळीवरची चर्चा झाल्याचेही वृत्त आहे. दोन्ही पक्षांकडून अंतिम शिक्कामोर्तब झाले नसले तरी, दोन्ही बाजूंनी चर्चेच्या फेऱ्या मात्र होत आहेत. (हेही वाचा, Dilip Walse Patil on Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या अल्टीमेटम नंतर गृहविभाग सतर्क, दिलीप वळसे पाटील म्हणाले 'आम्ही पूर्ण तयारीत')

आगामी काळात राज्यात मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या समजल्या जाणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका पार पडत आहेत. काही जिल्हा परिषदा आणि महापालिका या आगामी विधानसभा निवडणुकांची नांदी असतात. त्यामुळे या महापालिकांमधील निवडणुकीतील जय-पराजयाला विशेष महत्त्व असते. आजवर महाविकासआघाडीचा आणि स्थानिक पातळीवरील एखाद्या निवडणुकीचा अपवाद वगळता शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आली नाही. त्यामुळे मतदारांना आणि कार्यकर्त्यांनाही शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचीच अधिक सवय आहे. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या या आघाडीत शिवसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता यांची मने जुळणार का? याबाबतही उत्सुकता राहणार आहे.