भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिक मधील श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गडावर सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधांसह सुसज्ज असे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व्हावे अशी येथील ग्रामस्थ व भाविकांची कित्येक दिवसांपासून मागणी होती. त्या मागणीला आरोग्य तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिला आहे. लवकरच सप्तश्रृंगी गडावर सुसज्ज असे रुग्णालय सुरु केले जाईल असे सांगण्यात आले आहे.
सप्तश्रृंगी गडाचे उपसरपंच राजेश गवळी व काही सहकाऱ्यांनी बुधवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत सप्तशृंगी देवी गडावरील अनेक समस्यांची माहिती त्यांनी दिली. गडावर देवस्थान ट्रस्टचे एकमेव आरोग्यकेंद्र आहे. अपुरा औषधसाठा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाची कमतरता त्यातच अत्याधुनिक सेवा सुविधा नसल्याने अनेकदा रुग्णांचे हाल होतात. वेळेत उपचार न मिळाल्याने काही रुग्ण दगावतात. त्यांच्या या समस्येचा विचार करुन या गडावर सर्व सोयीसुविधा सुसज्ज असे रुग्णालय सुरु करण्यास त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रातील देवीची असलेली साडे तीन शक्तिपीठं
दरवर्षी लाखो भाविक तसेच पर्यटक सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर येतात. त्यात अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा देखील समावेश असतो. त्यामुळे हा घाट रस्ता आण उंचीवर असलेल्या या गडावर पोहोचत असताना अनेक छोटे-मोठे अपघात होतच असतात. अशावेळी अनेकदा वेळेत उपचार न मिळाल्याने पेशंट दगावतात.
एकूणच ही दयनीय परिस्थिती लक्षात घेता येत्या काळात लवकरात लवकरच गडावर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून त्याची उभारणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे. शिवाय गडावरील हॉस्पिटलचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून तत्काळ मंजूर करत कारवाईचे संकेतही या शिष्टमंडळाला दिले.