
समृद्धी महामार्गाने मुंबई-नाशिक प्रवास करताना बांधकाम व्यावसायिक सुनील हेकरे (Sunil Hekre) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मर्सिडीज गाडी पलटी झाल्याने गाडीमधील सारेच जण जखमी झाले होते. त्यामध्ये सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांच्या कुटुंबातील अन्य लोकांवर उपचार सुरू आहेत. मुंबई मध्ये एका कौटुंबिक सोहळ्यासाठी ते आले होते. तेथून परत जात असताना हा अपघात झाला आहे. सुनील यांंचा मुलगा गाडी चालवत होता.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, इगतपुरी बोगद्यापासून जवळच असलेल्या शहापूर हद्दीत मर्सिडीज गाडीला अपघात झाला. हेकरे कुटुंबीयांच्या बाजूने एक गाडी भरधाव वेगात गेली. रस्त्यावर साचलेलं पाणी त्यांच्या गाडीवर उडालं. काचेवर अचानक पाणी आलेलं पाहून चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी डिव्हायडर तोडून पलटी झाली. या अपघातामध्ये सुनील यांची पत्नी सुचेता, मुलगा अभिषेक आणि करण हे तिघेही जण जखमी झाले आहेत.
सुनील यांच्या निधनाची बातमी मिळताच आनंदवली येथील निवासस्थानी गर्दी झाली होती. हेकरे यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
समृद्धीच्या अखेरच्या टप्प्याचे नुकतेच उद्घाटन झाले होते. इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटर रस्त्याचे उद्घाटन होऊन तीन आठवडेही झालेले नसताना रस्त्यावर खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कंत्राटदाराच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.