महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात संघर्ष सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात शुक्रवारी (27 ऑगस्ट) बंद दाराआड चर्चा झाली. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असताना केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री आणि रिपाई अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाजप- शिवसेना (BJP-Shiv Sena) यांच्या युतीबाबत विधान केले आहे.
रामदास आठवले यांनी नुकताच सातऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध मुद्द्यावर भाष्य केले आहे. याचदरम्यान, त्यांनी भाजप- शिवसेना यांच्या युतीबाबतही विधान केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याची मला माहिती नाही. परंतु, या दोघांच्या भेटीनंतर भाजप- शिवसेना पुन्हा एकत्रित येण्याची शक्यता आहे, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Mumbai: मंत्रालय, नरिमन पॉईंटसाठी धोक्याची घंटा, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचा नागरिकांना इशारा
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींच्या आरक्षित जागा आवश्यक आहेत.त्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे, असेही रामदास आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
ओबीसींच्या आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक राज्यसरकार तर्फे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रीत करण्यात आले. मात्र, रिपब्लिकन पक्षाला निमंत्रित करण्यात आले नाही. याबद्दल रिपब्लिकन पक्ष तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे, असेही ट्विट रामदास आठवले यांनी केले आहे.