BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

राज्यातील जिम (Gym) तत्काळ सुरु करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार नाही. जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच त्याकडे पाहून चालणार नाही. तर, त्या संकटाचे सामाजिक, आर्थिक, मनोवैज्ञानिक परिणाम सुद्धा तपासले पाहिजे आणि आरोग्यासोबतचं आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ सुद्धा टिकून राहील, याचाही कटाक्षाने विचार केला पाहिजे, असंही देवेंद्र फडणवसांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.

राज्यातील दारु दुकानं उघडली आहेत. मात्र, जिम बंद ठेवण्यात आल्या आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचे अर्थकारण टिकले पाहिजे, हा आपला विचार असेल कदाचित. पण, राज्याचे आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे, हा विचार आपण का करु शकत नाही? खरे तर कोरोना नियंत्रणाची संपूर्ण रणनीतीच चुकली आहे. ज्या काळात चाचण्यांवर आपण भर द्यायला हवा होता, त्या काळात चाचण्या केल्या नाही. नंतर चाचण्या वाढल्या, हे भासविण्याचा प्रयत्न झाला. सध्या राज्यातील परिस्थिती अवघड झाली आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात आज 11 हजार 813 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर 413 जणांचा मृत्यू)

दरम्यान, अन्य राज्यात केश कर्तनालये लवकर उघडण्यात आली. महाराष्ट्रात ती उघडण्यासाठी आंदोलनाची तयारी करावी लागली. आज जिम सुरु करण्यासाठी सुद्धा अनेक लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत. माझ्याकडेही सातत्याने विनंती येत आहेत. यासंदर्भात होणार्‍या मागणीला माझे पूर्ण समर्थन आहे. राज्यातील जिमचालकांनी प्रतिबंधात्मक उपाय स्वत:च सूचविले आहेत. यात सरकारला आणखी काही भर घायलाची असेल, तर तेही करता येईल. मात्र, राज्यातील जिम तत्काळ सुरु करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंल आहे.