ही एसटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे बसमधील प्रवाशाला आपला दात गमवावा लागल्याची घटना भोसरी परिसरात घडली. एसटी भरधाव वेगाने गतिरोधकावरुन आदळल्याने ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रवाशाचा दात तुटल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, भरत सोनू चिखले असे या जखमी प्रवाशाचे नाव आहे. तर बसचालक नितीन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर-पुणे एसटी बस (ST Bus) मंचर येथून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यांना शेवटून दोन नंबरच्या सीटवर जागा मिळाली आहे. भोसरी उड्डाण पूल ओलांडल्यानंतर भरधाव वेगात असलेली एसटी अचानक गतिरोधकावरून जोरदार उसळी घेऊन आदळली. यामुळे जोरदार झटका बसून बसमधील अनेक प्रवासी काही फूट हवेत उडाले. या अपघातात एसटीतील निखळलेले स्क्रू चिखले यांच्या दातावर आदळले आणि त्यात त्यांचा समोरील एक दात पडला.
हेदेखील वाचा- भरधाव एसटी गतिरोधकावरुन आदळल्याने प्रवाशाला गमवावा लागला दात
काही वेळ त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू होता. दरम्यान, या घटनेप्रकरणी चिखले यांनी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र, तिथल्या पोलिस कर्मचाऱ्यांने त्यांना हे प्रकरण आपसांत मिटवून घेण्याचा सल्ला दिला. मात्र, चिखले तक्रारीवर ठाम राहिल्याने पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेतला आणि तपास सुरू केला.
एसटीचा प्रवास हा खासगी वाहनांपेक्षा सुरक्षित असतो अशी हमी एसटीकडून दिली जाते. मात्र तरीही अशा प्रकारचे अपघात होत असतात.त्यामुळे एसटी प्रशासनाने गांभीर्याने यात लक्ष घालावे अशी मागणी एसटी प्रवाशांकडून केली जात आहे.