राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार तसेच फेरपरीक्षा दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. मात्र, यावर्षी महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील ऑक्टोबर महिन्यात होणारी फेरपरीक्षा आता दिवळीनंतरच होणार, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दहावी आणि बारावीच्या मूल्यांकन प्रक्रियेस आणि पर्यायाने निकालास विलंब झाला होता. एवढेच नव्हेतर, लॉकडाऊनमुळे दहावीची भूगोल विषयाची परीक्षादेखील रद्द करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले आहेत.
फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थीची फेरपरीक्षा ही बहुतेक वेळा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. पण, यंदा कोरोनाचे संकट असल्याने ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कदाचित ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्या घेण्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Maharashtra University Final Year Exams 2020: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट; अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा
दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होता यावे, यासाठी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फेरपरीक्षेचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जुलै- ऑगस्ट दरम्यान फेरपरीक्षा घेतली जात आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहावी आणि बारावीचे निकाल उशीराने लागले होते. यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष वाचवण्याची संधी मिळालेली नाही.
दहावीमध्ये जवळपास एक लाख 25 हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये एक लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. तर, विज्ञान, कला, वाणिज्य आणि एचएसची व्होकेशनल या शाखांमधील एकूण 14, 20, 575 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14, 13, 687 विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले. त्यापैकी 12, 81, 712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 90.66 टक्के आहे.