मुंबई लोकलने जर तुम्ही बुधवारी ठाणे स्थानकावरुन (Thane Station) प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या साठी आहे. बुधवारी रात्री 11.55 पासून ठाणे स्थानकातील फलाट 6 आणि 7 वर पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पादचारी पुलाचा 5 मीटर रुंद गर्डर टाकण्यासाठी हा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात काही लोकल ट्रेन उशिराने (Mumbai Local Train) धावणार असून काही गाड्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटे 4.55 वाजेपर्यत हा पॉवब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
अप ट्रान्स हार्बर मार्ग आणि 5 व्या रेल्वे मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुलाचा गर्डर टाकण्यासाठी 140 टनाच्या क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. अप जलद आणि पाचव्या मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान मुंबईत येणाऱ्या हावडा -मुंबई एक्सप्रेस, आदिलाबाद-मुंबई नंदिग्राम एक्सप्रेस, चैन्नई- मुंबई एक्सप्रेस आणि पुडुचेरी -दादर एक्सप्रेस सहाव्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.
याशिवाय मुंबईतून जाणाऱ्या मुंबई-मडगाव , लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी तेजस एक्सप्रेस पाचव्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.