स्वार्थातून निर्माण झालेल्या क्रोधाची जागा बापाच्या जीवावर उठली. जमिनीच्या वादातून पोटच्या पोराने चक्क जन्मदात्या बापाची हत्या केली इतकेच नव्हे तर, मुलगा इतका क्रूर झाला की त्याने हत्या केल्यावर बापाच्या मृतदेहाच्या मांसाचे तुकडे दारातल्या कुत्र्याला खायला घातले. अत्यंत खळबळजनक आणि तितकीच करुन अशी ही घटना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील झरी (Zari Taluka) तालुक्यात येणाऱ्या खापरी (Khapri) गावात गुरुवारी (26 जुलै 2019) उघडकीस आली. दत्तू उरवते असे मृत झालेल्या वडिलांचे नाव आहे.
वडील दत्तू उरवते आणि मुलगा नामदेव उरवते यांच्यात जमीनिचा वाद होता. शेताच्या हिस्सेवाटणीवरुन हा वाद गेले अनेक दिवस सुरु होता. शेताची वाटणी करुन शेतीचा आपला वेगळा वाटा मुलगा नामदेव उरवते याला हवा होता. मात्र, मी जिवंत असेपर्यंत शेताची वाटणी करणार नाही, होऊ देणार नाही अशी दत्तू उरवते यांची भूमिका होती. या वादातून बुधवारी रात्रीही उरवते पितापूत्रांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.
दरम्यान, भांडण झाल्यानंतरही वडील दत्तू उरवते आणि मुलगा नामदेव यांनी आई नर्मदासोबत एकत्र जेवण केले. जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे ते झोपी गेले. दरम्यान, मध्यरात्री अचानक नामदेव आई-वडील झोपलेल्या ठिकाणी आला. त्याने हातातील काठीने वडीलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली. यात वडील दत्तू उरवते जागीच ठार झाले. वडिलांविषयीचा राग मुलगा नामदेव याच्या डोक्यात इतका शिरला होता की, त्याने वडील मृत झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाच्या मांसाचे तुकडे कुत्र्याला खाऊ घातले. (हेही वाचा, लातूर: माहिती अधिकारातून माहिती मागवत त्रास दिल्याच्या संतापाने भाजप कार्यकर्त्यावर चाकूहल्ला, मृत्यू)
घडल्या प्रकाराचा उलघडा होताच गावात एकच खळबळ उडाली. गावातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि घटनास्थळी गर्दी केली. प्राप्त झालेल्या माहितीवरुन ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी नामदेव याला अटक केली. पाटण पोलीस पढील तपास करत आहेत.