मुंबई: वेश्या बनविण्यासाठी अल्पवयीन मुलीला सिगारेटचे चटके; जन्मदाता बाप, सख्ख्या भावाचे क्रूर कृत्य, पीडिता कुर्ला रेल्वे स्थानकात सापडली
Prostitution | Image only representative purpose (Photo credit: File Image)

वेश्या (Prostitution) व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त व्हावी यासाठी अल्पवयीन तरुणाला चक्क सिगारेटचे चटके दिल्याची धक्कादायक घटना मुंबई (Mumbai) शहरात उघडकीस आली आहे. कुर्ला (Kurla) रेल्वे स्थानकावर एक अल्पवयीन गर्भवती मुलगी जखमी अवस्थेत असल्याची माहिती एका सामाजिक संस्थेला मिळाली. या संस्थेने तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी तिला सिगारेटचे चटके दिल्याचे समजले. तसेच, हा क्रूर प्रकार तिच्या जन्मदात्या बापानेच केल्याचे आणि त्यास तिच्या सख्ख्या भावाने मदत केल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली.

प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी ही 15 वर्षे वयाची आहे. पीडितेने माहिती देताना सांगितले की, तिची सावत्र आई देखील वेश्याव्यवसाय करते. तिच्या प्रामाणे या मुलीनेही वेश्याव्यवसाय करावा असा तिच्या वडिलांचा आणि भावाचा दबाव होता. हा व्यवसाय करण्यास आपण विरोध केल्याने वडील आणि भावाने आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. या अत्याचारातून आपण गर्भवती राहिल्यावर त्यांनी घरातून हाकलून दिल्याचेही पीडितेने सांगितले. (हेही वाचा, अमरावती: प्रियकराच्या गुप्तांगावर प्रेयसीने भिरकावला दगड; पीडिताच्या आईची पोलिसात धाव; रक्तबंबाळ तरुणावर ICU मध्ये उपचार)

घरातून हाकलून दिल्यानंतर निराधार झालेली ही पीडिता गर्भवती अवस्थेत शहरभर भटकत होती. आश्रयाच्या शोधात असलेली ही पीडिता भटकत भटकत कुर्ला रेल्वे स्थानकात पोहोचली. दरम्यान, या प्रकाराची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळाली. भोईवाडा पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही मुलगी मुबई सेंट्रल येथील अलेक्झांडर सिनेमागृहाजवळ राहत असल्याचे समजले. त्यानंतर भोईवाडा पोलिसांनी हा गुन्हा नागपाडा पोलीस ठाण्यात वर्ग केला.