Prakash Ambedkar | (Photo Credits-Twitter/ANI)

Prakash Ambedkar On Maharashtra Bandh: केंद्र सरकारने लागू केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला विविध कामगार व मुस्लिम संघटनांनी पाठिंबा दिला आहे. परंतु, आज सकाळपासूनच रास्तारोको, बस थांबवणे, बसवर दगडफेक करणे अशा घटना घडल्या असून या बंदला एक हिंसक वळण मिळाले आहे. त्याबद्दल एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

ते म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडीने आज पुकारलेला बंद हा शांततेच्या मार्गाने पुकारलेला आहे. परंतु, या बंदला काही लोक जाणीवपूर्वक हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत." त्यांनी संघावर देखील आरोप करत म्हटले की हिंदू मुसलमान दंगल घडवण्याचा संघाचा डाव आहे.

त्याबद्दल अधिक माहिती देत ते म्हणाले की आज बसेस, एसटी बाहेर पडल्या नाहीत व कुलाबा, भायखळा, हाजीअली पूर्णपणे बंद आहे. तसेच पुकारण्यात असलेला बंद हा 90 टक्के यशस्वीरित्या सुरु आहे असा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला.

पुढे ते असंही म्हणाले की, "बंदला हिंसक वळण देणारे आणि तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत. सुरु असलेल्या बंदमध्ये काही लोक चेहरा लपवून त्याला हिंसक वळण देत आहेत. त्यांना पोलिसांनी शोधून काढावं असे आवाहनही मी करतो."

Maharashtra Bandh: वंचित बहुजन आघाडी कडून 'महाराष्ट्र बंद' चं आवाहन; पहा मुंबई, पुणे, आकोला, बारामती मध्ये कसा मिळतोय प्रतिसाद!

आज पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये वंचित बहुजन आघाडीसोबाबत एकूण 35 संघटनांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान, या आधी CAA कायद्याविरुद्ध दिल्ली, आसाम, तामिळनाडूसह देशातील विविध भागांमध्ये आंदोलनं करण्यात आली आहेत.