Maharashtra Bandh:  वंचित बहुजन आघाडी कडून 'महाराष्ट्र बंद' चं आवाहन; पहा मुंबई, पुणे, आकोला, बारामती मध्ये कसा मिळतोय प्रतिसाद!
Maharashtra Bandh | Photo Credits: Twitter

महाराष्ट्रामध्ये आज वंचित बहुजन आघाडी (VBA) कडून सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC)  विरोधात बंदची हाक दिली आहे. 35 संघटनांचा समावेश असला तरीही राज्यात अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था आणि आर्थिक कामकाज सुरळीत सुरू आहे. दरम्यान काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी तोडफोड करायला सुरूवात केल्याने प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) कार्यकर्त्यांना शांततेमध्ये निषेध नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईमध्ये तिन्ही रेल्वे सेवा सुरळीत सुरू असून रस्ते वाहतूकदेखील सुरू ठेवली आहे. दरम्यान चेंबूर, रमाई नगर, सायन-पनवेल महामार्ग याठिकाणी आंदोलकांनी चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे शहरामध्ये व्यवहार सुरळीत सुरू असले तरीही बारामतीमध्ये बंदला प्रतिसाद मिळाल्याने व्यवहार ठप्प्प झाले आहेत. मनमाडमध्येही वंचितच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले आहे. आकोल्यामध्येही वंचितच्या बंदला प्रतिसाद मिळाला आहे. आकोल्यामध्ये आज मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. इथे पहा आजच्या दिवसभरातील घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स! 

पुणे शहरातील आजची स्थिती

देशात नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात अनेक निदर्शने करण्यात आली होती. सध्या नागरिक दुरूस्ती कायदा संपूर्ण देशात लागू झाला असून अनेक राज्यातून या कायद्याच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीने 24 जानेवारीला नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.

देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. तसेच जीएसटी, नोटबंदीमुळे सरकारला पुरेसा निधी मिळत नाही. याला केवळ केंद्र सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले आहे.