सोलापूर (Solapur) येथे राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या ताफ्याने वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांकडून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. या ताफ्यातील 8 गाड्यांवर कारवाई करण्यात आली. विधानसभेपूर्वी सुप्रिया सुळे यांचा हा दौरा सुरु झाला आहे, सोलापूरात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी हा प्रकार घडला आहे.
इंडियन मेडिकल असोसीएशनच्या सभागृहात संवाद ताईंशी नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमाला सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली होती. मात्र कार्यक्रमादरम्यान हॉल बाहेर त्यांच्या सोबत आलेल्या गाड्यांनी वाहतुकीस अडथळा झाला. या गाड्या रस्त्यावरच उभ्या असल्याने प्रत्येक गाडीनुसार दोनशे रुपयाप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. परंतु दंड स्विकारण्यापूर्वी पोलिसांनी रस्त्यावरुन गाड्या हलवण्याची सूचना दिली होती. तरीही गाड्या हलवल्या न गेल्याने ही कारवाई पोलिसांनी केली.(खासदार उदयनराजे भोसले भाजपात आल्यास आनंदच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना)
परंतु ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तेथे पार्किंगची सोय नव्हती. कार्यक्रमाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र परवानगी दिली होती तरीही पोलिसांनी जाणीवपूर्वक गाड्यांच्या ताफ्यावर कारवाई केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.