सोलापूर: पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी मंदीर भाविकांसाठी खुलं करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन; पोलिसांकडून नाकाबंदी, चोख बंदोबस्त

महाराष्ट्रामध्ये मार्च महिन्यापासून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी प्रार्थना स्थळांमधील दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता भाविकांसाठी खबरदारीचे उपाय घेत प्रार्थनास्थळं उघडावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामध्ये आज (31 ऑगस्ट) वंचित बहुजन आघाडीकडून पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर (Pandharpur Vitthal Rukmini Mandir)  उघडण्याची मागणी केली जाणार आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे (VBA) सदस्य आणि विश्व वारकरी सेना (Vishwa Varkari Sena) एकत्र येऊन आंदोलन करणार आहे. मात्र पोलिस प्रशासनाकडून त्यांना रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठण- रूक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची विश्व वारकारी सेनाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार आहे. मात्र कोरोमा व्हायरस लॉकडाऊन काळात प्रार्थनास्थळ बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने पोलिस्सांकडून आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. तर मंदिराजवळ चोख बंदोबस्त असून तिथे छावणीचे स्वरूप आले आहे.

सोलापूरमध्ये आज सुमारे 400 पोलिस कर्मचारी हे नाकाबंदीसाठी तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. केंद्रीय नियमावलीनुसार, प्रार्थनास्थळं सुरू करण्यास परवानगी आहे मात्र महाराष्ट्रात बंदी कायम आहे. आज काही वारकर्‍यांसोबत  वंचितचे प्रकाश आंंबेडकर सोलापूर जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार आहेत.

महाराष्ट्रात काल रात्री आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  कोरोनाचे 16,408 नवे रुग्ण आढळुन आल्याने एकुण कोरोनाबाधितांंची  संंख़्या  7 लाख 80 हजार 689 वर पोहचली आहे. राज्यात कोरोनाचे  1,93,548 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.