सोलापूर: भाजप खासदार जयसिद्देश्वर शिवाचार्य यांना नोटीस; लोकसभा निवडणुकीवेळी बनावट जातप्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण
BJP MP Mahaswamiji, Dr. Jaisidheshwar Shivacharya | (Photo Credit: Archived, edited, representative images)

सोलापूरचे (Solapur) भाजप (BJP) खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी नोटीस पाठविण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा जात पहाणी आणि पडताळणी समिती द्वारा ही नोटीस खासदार. डॉ. जयसिद्देश्वर महास्वामी (Mahaswamiji, Dr. Jaisiddeshwar Shivacharya) यांना पाठविण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019 ) मध्ये डॉ. जयसिद्देश्वर महास्वामी हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना डॉ. जयसिद्देश्वर महास्वामी यांनी बनावट जात प्रमाणत जोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी रिपाइंचे प्रमोद गायकवाड यांनी आगोदर सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती.

दरम्यान, एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सोलापूर जिल्हा जात पडताळणी, पाहणी समितीने खासदार डॉ. जयसिद्देश्वर महास्वामी यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीमध्ये आपल्या प्रमाणपत्राची सत्यता दिलेल्या मुदतीत पटवून द्यावी असे बजावण्यात आले आहे. त्यामुळे समितीच्या नोटीशीला खासदार महोदय कसे उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तक्रारकर्ते प्रमोद गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांचा बेडा जंगम जातीचा दाखला बनावट आहे. त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लख असल्याचा दावाही तक्रारकर्त्यांनी केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात प्रमोद गायकडवाड यांनी दाखल केलेल्या याचिकेत सोलापूर जिल्हाधिकारी, अक्कलकोट तहसीलदार, जात पडताळणी समिती सोलापूर, निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचा देखील समावेश आहे. ही याचिका दाखल करुन घेतल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस पाठवण्याचे निर्देश दिले. तसेच, प्रतिवादींना 5 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही दिले. (हेही वाचा, सोलापूर लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: सोलापूर मतदारसंघात रंगतोय काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असा तिरंगी सामना)

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर, भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी हरकत घेतली. मात्र, ही हरकत विचारात न घेता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जयसिद्धेश्वर महास्वामींचा अर्ज वैध ठरवला. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे बेडा जंगम जातीचा दाखला सादर करत उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांनी आपली उमेदवारी दाखल केली. मात्र, जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेत गायकवाड यांनी न्यायालयाकडे याचिका दाखल केली.