भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन (Smart Cities Mission) अंतर्गत आयोजित ‘इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धा 2020’ (India Smart City Awards Competition 2020) मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) ‘डिजी ठाणे’ (Digi Thane) या डिजिटल प्रकल्पाने भारतामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि टीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सुरत येथे एका समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. ही स्पर्धा कोविड-19 महामारीच्या काळात प्रकल्प अंमलबजावणी आणि राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारीत होती.
स्पर्धेचे दोन टप्प्यांत अनेक चाचण्यांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये एकूण 100 प्रकल्प सहभागी झाले होते. या प्रकल्पांपैकी कोविड-19 कालावधीत नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणाऱ्या 50 स्मार्ट सिटी प्रकल्पांची निवड करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या ‘डिजी ठाणे’ प्रकल्पाला ‘प्रशासन’ श्रेणीत दुसरा क्रमांक मिळाला आहे.
‘डिजी ठाणे’ने राबवलेले अनेक अभिनव उपक्रम शहरातील नागरिकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्याचबरोबर ‘डिजी ठाणे’ प्रकल्पाने महामारीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डिजी ठाणे मार्फत कोविड-19 चा अद्ययावत आकडेवारी डॅशबोर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. यामध्ये पॉझिटिव्ह रूग्ण, रूग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रूग्णांची संख्या, मृत्यू दर, रूग्णवाहिका सेवा इत्यादींची अद्ययावत माहिती समाविष्ट आहे. यामुळे कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉट क्षेत्रात धोरणात्मक निर्णय घेण्यात मदत झाली आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी, डिजी ठाणे कोविड-19 डॅशबोर्डच्या वेबसाइटवर विसर्जनाच्या वेळेचे स्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. शहरातील अनेक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला होता. (हेही वाचा: एमव्हीए सरकार कृत्रिम वीज संकट निर्माण करून लोकांना त्रास देत आहेत, भाजप नेत्याचा आरोप)
ठाणे महानगरपालिकेचा एक यशस्वी प्रकल्प असलेले डिजी ठाणे हे सर्वात संवादी वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप्लिकेशन बनले आहे. या प्रकल्पाला मिळालेल्या ठाणेकरांच्या उत्कृष्ठ प्रतिसादामुळे डिजी ठाण्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. या यशाबद्दल बोलताना टीएमसीचे अतिरिक्त आयुक्त आणि ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी म्हणाले, ‘ठाणे महापालिकेसाठी ही खरोखरच मोठी उपलब्धी आहे आणि ठाणेकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे.’