Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट Omicron मुळे जगभरात दहशत निर्माण झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, डेल्टा प्रकारापेक्षा पाचपट वेगाने पसरणाऱ्या या प्रकाराची लागण झालेले लोक जगातील सुमारे 15 देशांमध्ये आढळून आले आहेत. लसीकरण केलेल्या अनेक लोकांना याचा संसर्ग झाला आहे, यावरून हा प्रकार कितपत धोकादायक आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. गेल्या 19 दिवसांत (10 नोव्हेंबरपासून) दक्षिण आफ्रिकेतून सुमारे 1000 लोक मुंबईत आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

गेल्या 10 दिवसांत दक्षिण आफ्रिकेवरून मुंबईत आलेल्या लोकांचा शोध सुरू झाला असून त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. आफ्रिकन आणि युरोपीय देशांमध्ये ओमिक्रॉन संसर्गाचा झपाट्याने प्रसार झाल्याच्या वृत्तानंतर, अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांसाठी प्रवासी बंदी घातली आहे. आता आदित्य ठाकरेंनी दिलेल्या या माहितीमुळे तिथून येणाऱ्या विमानावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच केंद्राकडे ही मागणी केली आहे.

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून सुमारे एक हजार लोक मुंबईत आले आहेत. आत्तापर्यंत आलेल्या लोकांची माहिती मिळाली आहे. जे मुंबईत आहेत त्यांच्याशी मुंबई महापालिका संपर्क करत आहे. विशेषतः गेल्या दहा दिवसांपासून येथे आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. त्यांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्याची व्यवस्था केली जात आहे.’ यापूर्वी ओमिक्रॉनच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सोमवारी महत्त्वाची बैठक बोलावली होती. (हेही वाचा: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबई अलर्टवर; महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली उपाय योजनांबाबत माहिती)

फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया यांसारख्या देशांमध्ये दररोज 30 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. दुसऱ्या कोरोनाच्या लाटेसाठी जबाबदार असलेल्या डेल्टा प्रकाराचे 2 म्युटेशन होते, तर ओमिक्रॉनमध्ये 50 पेक्षा जास्त म्युटेशन्स आहेत. केंद्र सरकारने 12 देशांतून येणाऱ्या प्रवाशांना विमानात बसण्यापूर्वी 72 तास आधीचा RTPCR चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असण्याची अट घातली आहे.