राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; उद्या पार पडणार सुनावणी
सुप्रीम कोर्ट (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत असतानाच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. त्यानंतर आज संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आता राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने (Shiv Sena) सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी पुरेसा अवधी न दिल्यामुळे शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तातडीने उद्याच सकाळी साडेदहा वाजता या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू मांडणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी दिली.

राज्यपालांनी सत्तास्थापन करण्यासाठी भाजपला 2 दिवसांची मुदत दिली होती. मात्र शिवसेनाला अवघे 24 तास दिले गेले होते. इतक्या कमी वेळेत शिवसेना सत्ता स्थापन करू शकली नाही. याच बाबतीत शिवसेनेने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली गेली आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्याच शिवसेनच्या याचिकेवर सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका; काँग्रेस नेते कपिल सिब्बल मांडणार शिवसेनेची बाजू)

उद्या शिवसेनेच्यावतीने सुप्रीम कोर्टात काँग्रेस नेते आणि वरिष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. दरम्यान सध्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आपल्या आमदारांशी चर्चा करत आहेत. राष्ट्रवादीकडून शिवसेनेला 50-50 चा फॉर्म्युला देण्यात आलाच सूत्रांनी सांगितले आहे.