शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी नेत्यांनी मागितली राज्यपालांच्या भेटीची वेळ; सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटणार?
Governor of Maharashtra (Photo Credits: PTI)

कोणताही राजकीय पक्ष दिलेल्या वेळेत सत्ता स्थापन न करू शकल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तरीही प्रत्येक पक्षामध्ये सत्ता स्थापनेची चढा-ओढ अजूनही कायम असल्याचे दिसून येते.

माजी मुख्यमनातरी देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांची राजभवनावर (Devendra Fadnavis meets Governor of Maharashtra) जाऊन भेट घेतली. आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी देखील राज्यपालांकडे भेटीसाठी उद्याची (16 नोव्हेंबर) वेळ मागितली आहे. त्यामुळे ‘महाशिवआघाडी’ उद्या सत्तास्थापनेचा दावा तर करणार नाही ना (Mahashiv Aghadi to meet Governor) अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नेत्यांनी उद्या दुपारी तीन वाजताची वेळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागितली आहे. मात्र राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात तिन्ही पक्षांमधील कोणते नेते जाणार हे माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या शक्यतेसोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न व अन्य समस्या राज्यपालांच्या निदर्शनास आणण्याचं काम तिन्ही पक्षांचे नेते करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा घेतली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट

दरम्यान तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची काल पहिली समन्वय बैठक पार पडली आहे. या बैठकीत सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान सामायिक कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला असून तो तिन्ही पक्षांच्या पक्षप्रमुखांकडे पाठवण्यात आला आहे. परंतु या मसुद्यात नक्की कोणते मुद्दे असणार आहेत हे तिन्ही पक्षांच्या पक्षप्रमुखांकडे होकार आलाकीच माध्यमांना सांगण्यात येईल असं काल शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.