देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा घेतली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट
देवेंद्र फडणवीस आणि भगत सिंग कोश्यारी (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर सुद्धा राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. त्यानंतर भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)  यांनी सत्ता स्थापनासाठी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने कोश्यारी यांची भेट घेत आम्ही सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच राज्यपाल यांच्याकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना प्रथम काळजीवाहू मुख्यमंत्री पद देण्यात आले. त्यानंतरही अद्याप कोणत्याच पक्षाने सत्ता स्थापनेचा प्रस्ताव कोश्यारी यांच्याकडे न पोहचल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

मात्र आज सकाळी राजभवनात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. मात्र यावेळी भेटीदरम्यान सत्ता स्थापनेचा नव्हे तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान झाल्याने त्यासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी फडवणीस यांनी कोश्यारी यांच्याकडे केली आहे. तर मुख्यमंत्री सहायता निधीतून गरिब रुग्णांना दिलासा मिळतो. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबत काळजी घेण्यात यावी, अशी विनंती फडणवीसांनी केली. यावर राज्यपालांनी तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.(महाराष्ट्रातील सत्ता कोंडी लवकरच सुटण्याचे विजय वडेट्टीवार यांचे संकेत; शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत एकसुत्री कार्यक्रम मसुद्याचा ठरला ड्राफ्ट)

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याची सर्व सुत्रे भगत सिंग कोश्यारी यांच्या हातात आहेत. राज्यात विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला पूर्ण झाला. त्यानंतर सुद्धा पक्षांना सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ देऊ करण्यात आला होता. मात्र तरीही सत्ता स्थापन न झाल्याने अखेर राज्याची सर्व सुत्रे राज्यपालांच्या हाती गेली आहेत.