Sanjay Raut on State Government: राज्य सरकारने आपली जीभ दिल्लीकडे गहाण ठेवली आहे काय? संजय राऊत यांचे टीकास्त्र
Sanjay Raut | (Photo Credit - Twitter)

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचे कट्टर समर्थक आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विद्यमान राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पाठिमागील काही दिवसांपासून राज्यपाल, योगी बाबा आणि भाजप नेत्यांकडून महापुरुष आणि महिलांबद्दल केल्या जाणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात महिला आणि महापुरुषांचा अपमान होऊनही विद्यमान राज्य सरकार मूग गिळून गप्प आहे. राज्य सरकारने आपली जीभ दिल्लीकडे गहाण टाकली आहे का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज बुललढाणा जिल्ह्यात पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी ही टीका केली.

भाजपचे प्रचारक रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी नुकतेच महिलांबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केले. त्यांनी महिलांविषयी अनुद्गार काढले तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मंचावर होत्या. हाच धागा पकडत राऊत अमृता फडणवीस यांना उद्देशून म्हणाले. बाबा आसो किंवा इतर कोणीही असो. महिलांविषयी जर कोणी असे उद्गार काढले जात असतील तर अमृता वहिणी शांत बसल्याच कशा. त्याच वेळी खाडकन कानाखाली का नाही काढलीत?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज बुलढाण्यात शेतकरी मेळावा पार पडत आहे. या सभेत आज अनेकांचा हिशेब चुकता होईल. आजची सभा नेहमीप्रमाणेच दणदणीत होईल.राज्यपालांनी आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीकेलेल्या वक्तव्याचाही आज समाचार घेतला जाईल, असे राऊत म्हणाले. (हेही वाचा, Eknath Shinde Group Guwahati Visit: बदनामीची भीती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी? आमदारांची गुवाहीट दौऱ्याला दांडी)

शिवसेना पक्षात झालेल्या दुफळीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर दाखल होत आहेत. शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांनी तुडुंब प्रतिसाद दिला. त्यामुळे पक्षात कितीही फाटाफूट झाली तरीही ठाकरे यांना मानणारा तळागाळातील वर्ग प्रचंड मोठा आहे हे दिसून आले. आता आजच्या सभेला सर्वसामान्य नागरिक आणि शिवसैनिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची सभा पार पडत आहे. त्यामुळे आजच्या सभेत या दौऱ्याबद्दल ठाकरे काही बोलतात का? याबाबततही उत्सुकता आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात आजचा दिवस विशेष आकर्षणाचा आणि उत्सुकतेचा ठरणार आहे.