एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेत वेगळे झालेल्या 40 आमदारांपैकी काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या गुवाहाटी दौऱ्याला दांडी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर (CM Eknath Shinde Group Guwahati Visit) आहेत. या दौऱ्यात ते कामाख्या देवीचे दर्शन करणार आहेत. मात्र, समर्थक असलेल्या बहुतांश आमदार खासदारांपैकी काहींनी मात्र या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आमदारांच्या या अनुपस्थितीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, तीना आमदार आणि तीन मंत्र्यांनी या दौऱ्याला दांडी मारल्याची प्राथमिक माहिती आहे.
बदनामीची भीती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी?
आमदारांच्या दांडीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरु आहे. काही आमदारांना आता पुन्हा बदनामी नको अशी भीती वाटत आहे. त्यामुळे बदनामीच्या भीतने काहींनी दांडी मारली आहे. तर काहींची दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच नाराजी असल्याचे समजते. त्यामुळे शिंदे गटात वरवर सर्व ठिक वाटत असले तरी सगळेच काही अलबेल नाही, असेच चित्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (हेही वाचा, CM Eknath Shinde Guwahati Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांसोबत गुवाहाटी दौऱ्यावर, घेणार कामाख्या देवीचं दर्शन)
प्रकृती, घरगुती कार्यक्रम आणि व्यक्तीगत कारण
शिंदे गटातील काही आमदारांनी घरगुती कार्यक्रम असल्याचे कारण देत गुवाहाटी दौऱ्याला दांडी मारली आहे. तर काहींनी व्यक्तिगत आणि पूर्वनियोजीत कार्यक्रम असल्याने या दौऱ्याला दांडी मारल्याचे कारण दिले आहे. काहींनी प्रकृतीचे कारण पुढे करत दौऱ्याला येऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
तारीख बदलूनही फायदा नाही
एकनाथ शिंदे गटातील आमदार सुरुवातीला 21 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी दौऱ्याला जाणार होते. मात्र, त्यात अचानक बदल करुन पाच दिवसांनी हा दौरा पुढे ढकलण्यात आला. तसेच, आजचा म्हणजेच 26 नोव्हेंबरचा दिवस दौऱ्यासाठी निवडला असूनही आमदार आणि मंत्र्यानी दौऱ्याला दांडी मारल्याने तर्क वितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आमदार आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीबद्दल बोलताना म्हटले की, गुवाहाटीला जाण्याचे अचानक ठरले. त्यामुळे अनेक आमदार मंत्र्यांची गौरसोय झाली. काहीचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने त्यांना तो टाळता आला नाही. त्यामुळे ते या दौऱ्यासाठी येऊ शकले नाहीत. पण असे असले तरी कोणतेही गैरसमज नाहीत, असेही केसरकर म्हणाले.