विधानसभा निवडणूक 2019: शिवसेना-भाजप युती जागावाटप करणार कोण? उद्धव ठाकरे यांनी सांगितली तीन नावे
Amit Shah- Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter/File Photo)

Maharashtra Assembly Elections 2019: शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक 2019 युती (Alliance) करुन लढणार असल्याचे दोन्ही पक्षांनी जाहीर केले आहे. मात्र, असे असले तरी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन दोन्ही पक्षात ताणलेले संबंध कायम आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे नेते जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray) यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) युतीच्या जागावाटपाबाबत कोणी काही म्हणाले तरी, हा अधिकार मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अमित शहा (Amit Shah) यांचाच असणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव यांनी आपल्या विधानातून भाजप नेत्यांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या युतीच्या जागावाटपाबाबत विधानांवर प्रतिक्रिया दिली आहे. उल्लेखनीय असे की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP Alliance) च्या जागावाटपाबाबात नुकतेच एक विधान केले होते. या विधानानंतर आपली भुमीका ठासून सांगत उद्धव ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला किंमत देत नसल्याचे सूचीत केले आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

शिसेना-भाजप युती जागावाटपाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील नागपूर येथे म्हणाले होते की, निम्म्या जागांच्या समीकरणात युतीचे जागावाटप होणार नाही. जुन्या समीकरणानुसार जागा वाटप करणे योग्य ठरणार नाही. याची शिवसेना पक्षालाही जाणीव आहे, असे विधान पाटील यांनी केले होते. मित्र पक्षांना जागा सोडल्यावर उरलेल्या जागा निम्म्या वाटून घेण्याच्या युतीच्या समीकरणावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

प्रदेश महाराष्ट्रचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच हे वक्तव्य केल्याने विधानातील गांभीर्य वाढले होते. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी शिवसेना पक्षप्रमुखांना याबाबत विचारले नसते तरच नवल. सहाजिकच प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना पाटील यांच्या वक्तव्याबाबत शिवसेनेची भूमिका विचारली. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप जागावाटपाचा अधिकार मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचाच आहे. दरम्यान, या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस व अमित शहा यांच्याशिवाय आपण कोणाला गृहीत धरत नाही, असेही ठाकरे यांनी सांगीतले. ठाकरे यांच्या विधानातून त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला फारशी किंमत दिली नाही, असाच अर्थ राजकीय वर्तुळात काढला जाऊ लागला आहे. (हेही वाचा, छगन भुजबळ यांना शिवसेनेत एन्ट्री नाही, उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन)

विधानसभा निवडणूक 2014 ला महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर सामोरे गेले होते. शिवसेना-भाजप या पक्षांनी आपली 25 वर्षांची युती तोडली होती. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनीही आपली 15 वर्षांची आघाडी तोडली होती. त्यामुळे हे सर्व पक्ष स्वबळावर निवडणुकांना सामोरे गेले. परिणामी कोणत्या राजकीय पक्षाची जनतेतील किंमत किती हे प्रदीर्घ काळानंतर महाराष्ट्राला प्रथमच कळले होते. आता याच किमतीच्या आधारे हे सर्व पक्ष युती आणि आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावर भांडत आहेत.