Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात शिवसेना (Shiv Sena) पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत आज एक सूचक ट्विट केले आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, 'केंद्रीय एजन्सी अधिकारांचा गैरवापर करून काही जणांना वेठीस धरत आहे. त्याबाबत आज पंतप्रधान कार्यालकडे (PM's office) पुरावे सादर केले. काही अधिकारी वसुली एजंट्स मार्फत खंडणी आणि ब्लॅकमेलिंग करण्यात गुंतले आहेत. यााबत पंतप्रधान कार्यालयाकडे आज पुरवे सादर केले. अधिक तपशिलासाठी लवकरच एक पत्रकार परिषद घेणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, 'खेळ आता कुठे सुरु झाला आहे', असेही सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच 'शिवसेना' भवन येथे एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार हल्ला चढवला होता. प्रामुख्याने संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या वेळी संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, खरं म्हणजे आजची पत्रकार परिषद ही ईडी कार्यालयाबाहेर घ्यायची होती. मात्र, आम्ही सहकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर ठरले की, सुरुवात येथून करायची आणि शेवट ईडी कार्यालयाबाहेर करायचा. (हेही वाचा, Sanjay Raut: BMC शिपायांच्या घरावरही आता ते धाडी टाकतील, शिवसेना खासादर संजय राऊत यांचा केंद्रीय तपास यंत्रणांना टोला)

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये 'खेळ आता कुठे सुरु झाला आहे' असे ट्विटही केले आहे. त्यामुळे शिवसेना, महाराष्ट्र सरकार, महाविकासआघाडी आणि केंद्र सरकार, केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप यांच्यातील संघर्ष कोणते टोक गाठते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातच केवळ टॅक्स मिळतो आणि महाराष्ट्रातच इनकम आहे अशी केंद्रीय तपास यंत्रणांची धारणा आहे. त्यामुळे त्यांना केवळ महाराष्ट्रातच काम आहे, अशा पद्धतीचे वर्तन त्या करत आहेत. त्यातून महाष्ट्र आणि महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम करणे. खोटे पुरावे उभारणे तशीच प्रकरणे तयार करण्याकामी त्या गुंतल्या आहेत. याबाबत आपण पंतप्रधान कार्यालयाला पुरावे दिले आहेत. लवकरच याबाबत पत्रकार परिषद घेऊन अधिक तपशील दिला जाईल, असे म्हणत संजय राऊत यांनी उत्सुकता वाढवली आहे.