Sanjay Raut: BMC शिपायांच्या घरावरही आता ते धाडी टाकतील, शिवसेना खासादर संजय राऊत यांचा केंद्रीय तपास यंत्रणांना टोला
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election 2022) तोंडावर आहेत. त्यामुळे आता मुंबईत केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. आता शिवसेना (Shiv Sena), महाविकासविघाडीमधील नेत्यांनाच नव्हे तर महापालिकेत काम करणाऱ्या शिपायांच्या घरांवरही ते आता धाडी टाकतील, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीये तपास यंत्रणांना लगावला आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेना गटनेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयटीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. प्रसारमाध्यमांनी या छाप्याबाबत विचारले असता संजय राऊत बोलत होते.

संजय राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब या राज्यांना आणि राज्यातील जनतेला 2024 पर्यंत हे छापे, चौकशा आदींना सामोरे जावे लागणार आहे. आम्हाला माहिती आहे हे सुडाचे राजकारण आहे. पण, कितीही धाडी टाकल्या, चौकशा लावल्या तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही सर्व चौकशांना सामोरे जाऊ. आमचा आवाज सत्याचा आहे. सत्याचा आवाज कोणीही दडपू शकणार नाही. आम्ही या दडपशाहीला सामोरे जाऊ, असेही संजय राऊत यांनी या वेळी म्हटले. (हेही वाचा, BMC: मुंबई महापालिका गटनेते यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी; शिवसेना नगरसेवक रडारवर असल्याची चर्चा)

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये आदित्य ठाकरे यांनी प्रचार केला. आदित्य ठाकरे यांच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये एक झंजावात निर्माण झाला. आगामी काळात शिवसेनेचा भगवा उत्तर प्रदेशमध्येही फडकताना आपल्याला दिसेल. आदित्य ठाकरे यांनी काल डर्टी पॉलिटीक्स हा शब्दप्रयोग वापरला. तो योग्य आहे. भाजपमधील डर्टी 12 लोक हे राजकारण करत असल्याचेही संजय राऊत यांनी या वेळी सांगितले.