Sanjay Raut on Anil Parab: अनिल परब यांच्या शपथेवर विश्वास, सच्चा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ घेणार नाही- संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credit: ANI)

सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी कोर्टात दाखल केलेल्या पत्रावरुन शिवसेना ( Shiv Sena) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. सचिन वाझे यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्यावर या पत्रात काही आरोप लावण्यात आले आहेत. हे आरोप फेटाळून लावताना अनिल परब यांनी बाळासाहेबांची शपथ घेतली आहे. या शपथेवर आपला विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा सच्चा शिवसैनिक (Shiv Sainik) कधीच खोटी शपत घेणार नाही. हे मी विश्वासाने सांगतो, असे राऊत म्हणाले. या पत्रात अनिल परब, अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची नाव आहेत. या पत्राची सत्यता किती याबाबत अद्याप कोणालाही माहिती नाही. पत्रातील सत्यता समोर येत नाही तोपर्यंत काही बोलता येणार नाही. काही लोक सत्य जाणून न घेता केवळ प्रतिमा मलीन करण्यसाठी आरोप करत असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

आजकाल अनेक लोक पत्र लिहीत आहेत. या पत्रांतील काही लोक तुरुंगात आहेत. कोणी एनआयएच्या कोठडीत आहे, कोणी ईडीच्या तर कोणी सीबीआयच्या. हे पत्र लिहीणाऱ्या लोकांची विश्वासार्गताही तपासली पाहिजे. तुरुंगात असलेल्या लोकाकडून पत्र लिहून घेतली जात आहेत. यात एक नवीन नियुक्ती पुढे आली आहे. मी अनिल परब यांना ओळखतो हे एक राजकीय षडयंत्र आहे. ते कधीही अशा कामात भाग घेऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर कोणताही शिवसैनिक खोटी शपथ घेऊ शकत नाही, याची मी खात्री देतो, असेही संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, Anil Parab यांनी फेटाळले Sachin Vaze चे सर्व आरोप; म्हणाले- 'बाळासाहेबांची व आपल्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो हे सर्व खोटे आहे')

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रावर केलेल्या आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकार काय करत आहे हे सर्वांना माहिती आहे. जागतिक आरोग्य संघटना ते गुजरात उच्च न्यायालय आदींपर्यंत सर्वांनी दखल घेतली आहे. असे असतानाही केवळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न होतो आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी डॉ. हर्षवर्धन यांना प्रत्युत्तर दिले आहे. सध्याचा हा काळ कोरोना व्हायरस सारख्या मोठ्या संकटाचा आहे. असा काळात दोषारोप करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. मात्र, त्या ऐवजी काही मंडळी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार बदनाम कसे होईल हे पाहात असल्याचे राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्येही म्हटले आहे की, जेल मधील पत्रलेखन हा संशोधनाचा तितकाच अभ्यासाचा विषय आहे. असे काही पत्रलेखक इतरांना देखील मिळू शकतात. एकंदरीत सर्व स्तरावर गलिच्छ राजकारणाने टोक गाठले आहे. महाराष्ट्राची प्रतिमा कलंकीत करण्याचे इतिहासातील हे सगळ्यात मोठे साडेतीन अती शहाण्यांचे कारस्थान दिसतेय.