Anil Parab यांनी फेटाळले Sachin Vaze चे सर्व आरोप; म्हणाले- 'बाळासाहेबांची व आपल्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो हे सर्व खोटे आहे'
Anil Parab | (File Photo)

आज एनआयए (NIA) कोर्टामध्ये सचिन वाझे (Sachin Vaze) याने एक पत्र दिले असून, त्यामध्ये अनिल देशमुख (Anil Deshmukh) व अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज संध्याकाळी या पत्राबाबत अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन वाझे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे पत्र म्हणजे आपल्याला बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सचिन वाझे याने आरोप केला आहे की, अनिल परब यांनी त्यांना बीएमसी कंत्राटदाराकडून पैसे वसूल करण्यास सांगितले होते. याशिवाय अनिल परब यांनी सचिन वाझेला एसबीयूटी (SBUT) ट्रस्टच्या एका प्रकरणात 50 कोटी जमा करण्यास सांगितले होते.

या सर्व आरोपांचे खंडन करीत परब म्हणाले, ‘मी शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे बाळासाहेबांची व माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन मी हे सांगतो की सचिन वाझे याने केलेले आरोप खोटे आहे. याद्वारे मला बदनाम केले जात आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘गेले काही दिवस भाजपचे लोक म्हणत होते की, ‘आम्ही अजून एक विकेट घेऊ’, यावरून असे दिसून येते की भाजपला हे आधी पासूनच माहित होते की सचिन वाझे असे काही पत्र देणार आहे. हे सर्व आरोप खोटे असल्याने मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.’

नक्की काय आहे प्रकरण –

मुंबई पोलीसचे निलंबित उपनिरीक्षक सचिन वाझे यांच्या वकिलांनी, बुधवारी माध्यमांसमोर वाझे यांचे कथित पत्र सादर केले. या पत्रात वाझे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केला आहे. तसेच, ऑक्टोबर 2020 मध्ये सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये देशमुख यांनी आपल्याला बोलावून, 1650 बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे वसूल करण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (हेही वाचा: परमबीर सिंह प्रकरणात अनिल देशमुख, महाविकासआघाडी सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका)

सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.