Sanjay Raut on Petrol Diesel Rate | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्र सरकारने एक्साइज ड्यूटी (Excise Duty) कमी केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल दर काही प्रमाणात कमी झाले. यावरुन शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रावर हल्ला चढवला आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेल (Petrol Diesel Rate) दरातून बेहिशोबी पैसा जमा केला. जो आपण मोजूच शकत नाही. आता केंद्राने किमान 25 ते 50 रुपयांनी तरी इंधन दराच्या किमती कमी करायला हव्या होत्या. मात्र, देशभरातील विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीत हातील आलेले निकाल पाहून भाजप धास्तावले आहे. त्यामुळेच केंद्राने इंधन दर कमी करण्याचे पाऊल टाकले असे राऊत यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी म्हटले की, पोटनिवडणुकीत मिळालेल्या धक्क्यामुळे जर भाजप सरकार पाच किंवा 10 रुपयांनी इंधन दर कमी करत आसेल तर विचार करा पेट्रोल, डिझेल 50 रुपयांनी कमी करण्यासाठी किती मोठा धक्का द्यायला लागेल. भाजपला पूर्णपणे हरवले तर तर पेट्रोल, डिझेल 50 रुपयांनी स्वस्त मिळवता येऊ शकते, अशी क्लृप्ती सुद्धा संजय राऊत यांनी सांगितली. (हेही वाचा, Petrol Diesel Tax: केंद्रापाठोपाठ 'या' राज्यांकडूनही पेट्रोल, डिझेल दरात कपात)

देशातील महागाई कमी करायची असेल तर त्यासाठी भाजपला पराभूत करायला हवे असे सांगताना संजय राऊत यांनी शिवसेना हळूहळू आपला विस्तार वाढवत असल्याचेही म्हटले. आज शिवसेना खासदारांची संसदेतील संख्या 22 इतकी झाली आहे. मोदी मोदी यांच्या नावाने जप करणाऱ्यांनी माती खाली असा टोलाही राऊत यांनी लगावला. शिवसेना खासदारांची संख्या हळूहळू 50 होईल असा आशावाद व्यक्त करत राऊत म्हाणाले लोकशाहीत स्वप्नं पाहण्याचा अधिकार सर्वांना आहे. केवळ भाजपनेच स्वप्नं पाहावीत असे काही नाही. इतर पक्षही स्वप्न पाहू शकतात, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, दिवाळी हा भारतातील आणि हिंदू परंपरेतील सर्वात मोठा सण आहे. अशा वेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगात आहे. त्यांच्यावर आरोप करणारा व्यक्ती पळून गेला आहे. त्यामुळे देशमुख यांना झालेली अटक कायद्याला धरुन नाही, असेही राऊत म्हणाले.